FD Investment : एफडीवरच भारतीयांचा का आहे भरवसा? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
FD Investment : गुंतवणुकीचे अनेक पर्याय असताना भारतीयांनी मात्र एफडीवरच भरवसा दाखविला आहे. मुदत ठेवीवरच भारतीय का विश्वास दाखवत आहेत, याची माहिती एका अहवालात उघड करण्यात आली आहे. काय आहे या अहवालात ?
नवी दिल्ली : गुंतवणुकीचे अनेक पर्याय असताना भारतीयांनी मात्र एफडीवरच भरवसा (Indians Invest in FD) दाखविला आहे. मुदत ठेवीवरच भारतीय का विश्वास दाखवत आहेत, याची माहिती एका अहवालात उघड करण्यात आली आहे. शेअर बाजारात (Share Market) सातत्याने चढउतार होत असल्याने भारतीयांनी एफडीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. याविषयी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 44% टक्क्यांहून अधिक लोकांनी मुदत ठेवीत गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तीन वर्षातच एफडीच्या माध्यमातून चांगली कमाई होत असल्याने भारतीयांनी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक वाढवली. 23% लोकांनी आपत्कालीन निधीसाठी एफडीची तरतूद केली आहे. मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक जोखीममुक्त असते. त्याचा परतावाही जोरदार आहे. तसेच विना जोखीम गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
ऑनलाईन गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन संस्था कुवेराने हे सर्वेक्षण केले आहे. भारतीयांमध्ये एफडीची लोकप्रियता का जास्त आहे, याविषयीची कारणे या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात 16 लाख गुंतवणूकदारांचा समावेश होता. या सर्वांचा मुदत ठेव योजनेवर भरवसा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा आणि चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जण शेअर बाजार अथवा इतर पर्याय सोडून एफडीत गुंतवणूक करत असल्याचे उघड झाले. शेअर बाजारात सातत्याने भूकंप येत असल्याने नव आणि परंपरागत गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडला आहे. मेहनतीचा पैसा शेअर बाजारात बुडण्याच्या भीतीनेही अनेकांनी एफडीचा मार्ग स्वीकारल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. गुंतवणूकदारांचा मोठा वर्ग सध्याच्या महागाईच्या काळात जोखीम घेण्याचे टाळत असल्याचे समोर आले आहे.
2017 मध्ये सेबीनेही एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतातील 95% अधिक कुटुंबियांनी त्यांचा निधी शेअर बाजाराऐवजी मुदत ठेवीत ठेवणे पसंत केल्याचे सांगितले. तर केवळ 10% कुटुंबियांनी गुंतवणुकीसाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडला प्राथमिकता दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचा आकडा दिला आहे. त्यानुसार, मार्च 2022 मध्ये बँकांच्या मुदत ठेव योजनेत 2,242.775 अब्ज अमेरिकन डॉलर पेक्षाही जास्त गुंतवणूक करण्यात आली होती.
कुवेराच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार, महागाईवर मात करण्यासाठी भारतीय म्युच्युअल फंड, शेअर बाजार वा अन्य पर्यायांपेक्षा एफडीवर अधिक भर देत आहेत. पाचपैकी एका भारतीयाचा एफडीवर विश्वास आहे. 12% गुंतवणूकदारांनी एफडीतील गुंतवणुकीला प्राथमिकता दिली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने आता एफडीतील गुंतवणूक ही फायदेशीर होणार आहे.