Wipro कंपनीच्या नवीन सीईओचा पगार किती? आकडा पाहून येईल आकडी
Wipro CEO Srinivas Pallia Salary : देशभरात लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. एप्रिल महिना संपून एकच दिवस झाला आहे. हा महिना तसा ॲप्रायझलचा असतो. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लावतात. विप्रो कंपनीने नवीन सीईओ नियुक्त करतानाच त्याला इतका पगार दिला आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
एप्रिल महिना संपून एकच दिवस उलटला आहे. हा महिना कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यांकन करणारा असतो. त्याआधारे त्यांना पगारवाढ देण्यात येते. ॲप्रायझलच्या माध्यमातून ही लॉटरी लागते. विप्रोने यादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. विप्रोने नवीन सीईओची नियुक्ती केली आहे. सीईओ श्रीनिवास पल्लिया यांच्या नावाची घोषणा अगोदरच झाली होती. पण आता चर्चा सुरु आहे ती त्यांच्या पगाराची. त्यांना कंपनीने 60 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 50 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. यामध्ये कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर अनुषांगिक लाभाचा पण समावेश आहे.
कंपनी बोर्डाने घेतले हे निर्णय
बंगळुरुमधील आयटी कंपनीने शेअर बाजाराला या नवीन अपडेटविषयी माहिती दिली. यापूर्वीचे सीईओ थिअरी डेलापोर्टे यांनी अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर पल्लिया यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षी विप्रोने डेलापोर्टे यांना 80 कोटी रुपयांहून अधिकचे वार्षिक वेतन दिले होते. त्यावेळी त्याची एकच चर्चा झाली होती. विप्रोने पल्लिया यांच्या वेतनाविषयीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्यानुसार, त्यांचे वेतन हे सर्व अनुषांगिक लाभासह 35 लाख डॉलर ते 60 लाख डॉलर प्रति वर्ष इतके असेल.
गेल्यावर्षी प्रमुख पदी महिला
देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये विप्रो (Wipro) ही एक आहे. कंपनीने गेल्यावर्षी मोठा निर्णय घेत अपर्णा सी अय्यर (Aparna Iyer) यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी टाकली. त्यांना चीफ फायनेन्शिअल ऑफिसरची (CFO) जबाबदारी दिली. अय्यर या 2003 पासून विप्रोसोबत जोडल्या गेल्या आहेत. सिनिअर इंटरनल ऑडिटर म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. कंपनीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर कामगिरी बजावली आहे. जतीन दलाल यांनी सीएफओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर अय्यर यांची नेमणूक करण्यात आली होती.
कंपनीने केली मोठी कपात
विप्रोने शुक्रवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च 2024 पर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊन 2,34,054 इतकी झाली आहे. गेल्यावर्षीचा विचार केला तर एप्रिल महिन्याच्या अखेरीस कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 2,58,570 इतकी होती. तर मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 24,516 ने रोडावली आहे.