कार धावणार केवळ प्रति किलोमीटर 4 रुपयांत; Reliance आणि L&T चा प्लॅन काय
पेट्रोल, डिझेलमुळे तुमच्या फिरण्याच्या सवयीला मोडता घालण्याची गरज नाही. तुमची कार केवळ 4 रुपये प्रति किलोमीटरने धावणार आहे.रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी त्यासाठी एक योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 1 लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 10 वर्षांत वाढले आहे. इलेक्ट्रिक कार अजून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. अशावेळी जर तुमची कार प्रति किलोमीटर 4 रुपये इंधनावर धावली तर? रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. रिलायन्स आणि लार्सन अँड टुब्रो या दोन कंपन्या या प्रकल्पासाठी संयुक्त उपक्रम राबविणार आहे. या प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आहे. त्यामाध्यमातून हे नव इंधन विकसीत होणार आहे. काय आहे हे इंधन, काय आहे ही योजना…
कांडला बंदरावर प्रकल्प
- ET ने याविषयीचे वृत्त दिले आहे, त्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कंपन्यांनी दीनदयाल बंदरात एक मोठी जमीन अधिग्रहित करण्याची योजना आखली होती. चार कंपन्या 14 भूखंड खरेदी करणार होते. हा प्रत्येक भूखंड जवळपास 300 एकराचा होता. हा संपूर्ण परिसर जवळपास 4,000 एकरचा आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या काळात गुजरातमधील दीनदयाल पोर्ट अथॉरिटी, कांडला पोर्ट येथे ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्प सुरु करण्याच्या विचारात आहेत. कंपनी हे प्रकल्प लार्सन अँड टुब्रो, ग्रीनको ग्रुप आणि वेलस्पन न्यू एनर्जी सारख्या कंपन्यांच्या मदतीने तयार करणार आहे.
- एका वृत्तानुसार, दीनदयाल पोर्ट अथॉरिटीने गेल्या महिन्यातच या चार कंपन्यांना हे भूखंड वाटप केले आहेत. येथील प्रत्येक भूखंडावर प्रति वर्षी 10 लाख टन ग्रीन अमोनियाचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या 14 भूखंडापैकी रिलायन्स इंडस्ट्रीजला 6, एलअँडटीला 5, ग्रीनको ग्रुपला 2 आणि वेलस्पन न्यू एनर्जी समूहाला 1 भूखंड देण्यात आला आहे.
ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया उत्पादनाचे लक्ष्य
कांडला पोर्टमध्ये 70 लाख टन ग्रीन अमोनिया आणि 14 लाख टन ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाचे लक्ष्य आहे. हे बंदर कच्छच्या खाडीत आहे. येथून त्याची निर्यात करणे सोपे होईल. ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन पाणीच्ये इलेक्ट्रोलायझिंग प्रक्रियेतून करण्यात येते. त्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर करण्यात येतो. यामध्ये कार्बनचे उत्सर्जन होत नाही.
केवळ चार रुपयांत एक किलोमीटर
हायड्रोजनला भविष्यातील इंधन म्हणून ओळखले जाते. हायड्रोजन इंजिनने चालणाऱ्या कारमध्ये फ्यूएल सेलचा वापर करण्यात येणार आहे. हायड्रोजनच्या उपयोगातून वीज उत्पादन करण्यात येईल. यामुळे प्रदूषण होणार नाही. पेट्रोल वा डिझेल कारचा सर्वसाधारण खर्च 8 ते 10 रुपये प्रति किलोमीटर इतका येतो. तर ग्रीन हायड्रोजनचा खर्च 4 ते 5 रुपये प्रति किलोमीटर येईल.