नवी दिल्ली : ऑनलाईन फुड डिलिव्हरी (Online Food Delivery) फर्म झोमॅटो (Zomato) पुन्हा एकदा वादात अडकली. एका जाहिरातीवरुन कंपनी ट्रोल झाली. कंपनीच्या एका जाहिरातीवर मोठा खल झाला. झोमॅटोने जागतिक पर्यावरण दिनी ही जाहिरात केली होती. पण ती कंपनीच्या चांगलीच अंगलट आली. आमिर खानच्या लगान या चित्रपटातील एक पात्र त्यासाठी वापरण्यात आले होते. त्याच्याआधारे ही जाहिरात करण्यात आली होती. ही जाहिरात प्रसिद्ध होताच वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर झोमॅटोचा (Zomato Ad Controversy) सर्वांनीच क्लास घेतला. वाद चिघळण्यापूर्वीच कंपनीने मग हे पाऊल टाकले.
वादाची मालिका
तर या जाहिरातीवरुन झोमॅटो चांगलीच ट्रोल झाली. यापूर्वी, गेल्यावर्षी पण या कंपनीने अशीच वादग्रस्त जाहिरात केली होती. त्यावेळीही कंपनीला एक पाऊल मागे यावे लागेल होते. कंपनीला माफी मागत या वादावर पडदा टाकावा लागला होता. पण या चुकीपासून झोमॅटोने कसलाच धडा घेतला नाही. कंपनीने यंदा केलेली जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला. यापूर्वी पण अनेक कंपन्या चुकीच्या जाहिरातींमुळे ट्रोल झाल्या आहेत. पण सलग वाद उफाळून येण्यात झोमॅटो सातत्याने पुढे आहे.
गेल्यावर्षीची जाहिरात
गेल्यावर्षी झोमॅटोच्या जाहिरातीवरुन प्रचंड वादंग उठले होते. या जाहिरातीत सिनेअभिनेता ऋतिक रोशन बोलताना दाखविण्यात आले होते. भूक लागली तर उज्जैन येथील भगवान महाकाल यांच्याकडून जेवण मागविले, अशा आशयाची ही जाहिरात होती. महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. महाकाल मंदिरातून ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या जेवणाची डिलिव्हरी करण्यात येत नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्याचा दावा करण्यात आला होता. सोशल माध्यमांवर टीकेनंतर झोमॅटोने माफी मागत प्रकरणावर पडदा टाकला.
यावेळी पण वाद
फुड डिलिव्हरी एप झोमॅटोने जागतिक पर्यावरण दिनी लगान चित्रपटातील एका पात्राचा आधार घेतला. त्याआधारे जाहिरात केली. त्यांनी कचरा थिमवर एक जाहिरात तयार केली. या जाहिरातीत 2001मध्ये आलेल्या लगानमधील कचरा नावाच्या एका पात्राचा उल्लेख करण्यात आला. कचऱ्याच्या रुपात हे पात्र जाहिरातीत रंगविण्यात आले. त्यावरुन युझर्सने झोमॅटोला टार्गेट केले. कंपनीवर सर्वच जण तुटून पडले. कचऱ्याचा वाद अंगलट येत असल्याचे दिसताच कंपनीने पुन्हा माफीनामा देत जाहिरात मागे घेतली. आता तरी पुढे कंपनीने जाहिरात करताना काळजी घेण्याची चाहत्यांची इच्छा आहे.