Zomato CEO दीपिंदर गोयलचे दुसऱ्यांदा शुभमंगल सावधान, या मॅक्सिकन मॉडलशी केले लग्न
झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी फर्मचे सहसंस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. त्याने मॅक्सिकन मॉडलसोबत लग्नगाठ जुळवली. त्यांची पहिली बायको दिल्ली विश्वविद्यालयात गणित विषयाची प्राध्यापिका आहे. पण दोघांचे संसाराचे गणित जुळले नाही.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे सहसंस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. हिंदूस्थान टाईम्सच्या एका वृ्तानुसार, गोयल याने एक महिन्यापूर्वीच मॅक्सिकन मॉडल ग्रेसिया मुनोज (Grecia Munoz) सोबत दोनाचे चार हात केले. झोमॅटोने फूड डिलिव्हरी इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केला आहे. गोयलचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने आयआयटी दिल्लीमधील त्याची वर्गमैत्रिणी कंचन जोशीसोबत लग्न केले होते. कंचन जोशी या सध्या दिल्ली विश्वविद्यालयात गणिताच्या प्राध्यापिका आहेत. मूळची मॅक्सिकन असलेली ग्रेसिया मुनोज सध्या भारतात राहत आहे. जानेवारी महिन्यात मुनोजने दिल्लीतील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या आणि त्याचे फोटो पण सोशल मीडियावर शेअर केले होते.
कोण आहे ग्रेसिया मुनोज
ग्रेसिया मुनोज ही मॅक्सिकोत राहते. ती व्यवसायाने एक मॉडल आणि टेलिव्हिझन होस्ट आहे. ग्रेसिया 2022 मधील अमेरिकेच्या मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेती राहिलेली आहे. ग्रेसिया सध्या भारतात आहे. दीपिंदर गोयल याने 2008 मध्ये झोमॅटो कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीचे मूल्य सध्या दीड लाख कोटी रुपये इतके आहे. दीपिंदर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. आज कंपनी भारतासह युएई आणि इतर अनेक देशात व्यवसाय करत आहे. झोमॅटोचे मार्केट कॅपिटल 1.40 लाख कोटी रुपये आहे. तर दीपिंदरची एकूण संपत्ती जवळपास 2570 कोटी रुपये आहे.
आता शाकाहारी जेवण
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) सध्या चर्चेत आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी गेल्या मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक मोठी घोषणा केली. शाकाहारी जेवण आवडणाऱ्या ग्राहकांसाठी शुद्ध शाकाहारी सेवा देण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला. गोयलने एक्सवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली. जगभरात सर्वाधिक शाकाहारी माणसं भारतात आहेत. झोमॅटो शाकाहारी जेवण हे हिरव्या रंगाच्या पिशव्यातील डब्ब्यातून पुरवणार आहे. या घोषणेनंतर झोमॅटो सोशल मीडियावर ट्रेंड झाला. काही लोकांनी त्याला विरोध केला तर काहींनी पाठ थोपटली.