झोमॅटोच्या कामगिरीने अनेकांचे डोळे दिपले; गुंतवणूकदार एकाच वर्षांत मालामाल, 1 लाखांचे असे 3 लाख झाले
Share Big Return : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी हेलकावे खाल्यानंतर झोमॅटोच्या शेअरने दमदार कामगिरी बजावली. एकाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये 19% पर्यंत वाढ दिसून आली. हा शेअर आता 278.7 रुपयांवर पोहचला आहे. जून महिन्यात कंपनीने निकाल घोषीत केले. ताळेबंद सादर केला. त्यानंतर शेअरमध्ये तुफान आले. अनेक ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची होडी बाजारात हेलकावे खात असताना तिने पुनरागमन कसे केले. नुकसानीतून फायद्याचे गणित कसे जमवले, याचे अनेकांना नवल वाटत आहे.
अजून तेजीचे सत्र?
सध्याचे तेजीचे सत्र आणि निव्वळ नफ्यातील वाढ पाहता, CLSA ने झोमॅटोच्या शेअरसाठी त्यांची टार्गेट प्राईस वाढवून 350 रुपये इतकी केली आहे. तर या फर्मने आर्थिक वर्ष 2025 ते 2027 या कालावधीत झोमॅटोच्या कमाईचा अंदाज 6% टक्क्यांहून 36% इतका केला आहे. लोक आता किराणा सामान सुद्धा ऑनलाईन खरेदी करत आहे. परिणामी येत्या काळात झोमॅटोच्या नफ्यात आणि व्यवसायात वृद्धी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जास्त भरवसा ब्लिंकिटवर?
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी रिटेल, किराणा आणि ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये ब्लिंकिटवर जास्त भरवसा दाखवला आहे. झोमॅटोपेक्षा तिचा वृद्धी दर अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ब्लिंकिटच्या स्टॉकची किंमती वाढवून 300 रुपये करण्यात आली आहे. तर झोमॅटो आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4% आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये 8.7% फरकाने पुढे जाण्याचा अंदाज आहे. इक्विरस आणि आयसीआयसीआय सिक्योरिटीज सारख्या इतर ब्रोकरेज फर्म यांनी झोमॅटोला 300 रुपये वा त्यापेक्षा अधिकचे लक्ष्य ठेवले आहे.
5 तिमाहीत कंपनीचा वृद्धी दर
कंपनीचा निव्वळ फायद्याचा विचार करता, जून 2023 मध्ये कंपनी पहिल्यांदा नफ्यात आली. कंपनीला 2 कोटी रुपयांचा फायदा झाला. तेव्हापासून कंपनीला दर तिमाहीला फायदा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात 36 कोटींची कमाई केली. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये नफा वाढून 138 कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 175 कोटी रुपयांचा नफा झाला. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 253 कोटी रुपयांचा फायदा झाला.
फायद्याचे गणित जमवले कसे?
Business Model मध्ये बदल केल्याने कंपनीला नफा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कंपनी सुरुवातीला काही वर्षे तोट्यात गेली. तेव्हापासून ही कंपनी फायद्यात येण्यासाठी कसरत करत होती. त्यावेळी कंपनीला ऑफरचा धडाका करावा लागत होता. त्याचा कंपनीच्या कमाईवर परिणाम होत होता. आता कंपनीने ऑफर कमी करुन शुल्क आकारणी सुरु केली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.