मुंबई पालिकेतील लिपिक पदासाठी ही जाचक अट रद्द केली, नव्याने भरती प्रक्रीया सुरु,मोठा दिलासा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ ( पूर्वीचे पद: लिपिक ) संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रीयेतील जाचक अट रद्द झाली आहे. त्यामुळे आता नव्याने भरती प्रक्रीया सुरु होणार आहे. त्यामुळे लाखो जणांना या भरती प्रक्रीयेत सामील होण्याची संधी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पद: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( दहावी ) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना आणि मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
आधी अर्ज केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही
या शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ ( पूर्वीचे पदनाम: लिपिक ) संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक 9 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
किमान 45 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण
या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा असे म्हटले आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा अशी आधी अट घालण्यात आली होती.