नवी दिल्ली : आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL TECHNOLOGY) फ्रेशर्ससाठी संधीची दार खुली आहे. कंपनीत नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पॅकेजमध्ये घसघशीत वाढ केली आहे. एचसीएलमध्ये शिक्षण पूर्ण होऊन नव्याने जॉईन होणाऱ्या प्रत्येक फ्रेशर्सला किमान 4.25 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज (ANNUAL PACKAGE) मिळेल. यापूर्वी साधारण 3.5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. चालू वित्तीय वर्षापासून कंपनीने सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख व्ही.अप्पाराव यांनी दिली आहे. एचसीएल ही आयटी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. आयटी क्षेत्रात कोविड (COVID CRISIS) नंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. कुशल मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच कंपन्या बदलाचा वेग अलीकडच्या वर्षात वाढला आहे.
कुशल मनुष्यबळाला आकर्षक पगार उपलब्ध करण्याचं एचसीएलचं पूर्वीपासूनचं धोरण होतं. नुकतीच पदवी संपादन करून जॉईन होणाऱ्या फ्रेशर्सला कंपनी वार्षिक 4.25 लाख पॅकेज अदा करीत आहे. तसेच कंपनीत जॉईन झाल्यानंतरही कंपनीच्या माध्यमातून सर्टिफिकेट प्रोग्राम हाती घेतले जात आहेत. स्किल अपग्रेड सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले जाते. त्यामुळे एचसीएल कंपनीने शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमातच स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन अधिकाधिक पॅकेज उपलब्ध होईल.
कंपनी चालू वित्तीय वर्षात फ्रेशर्ससाठी बंपर भरती उपलब्ध करणार आहे. वित्तीय वर्ष 2022 मध्ये कंपनीने 22000 फ्रेशर्सना संधी दिली होती. वर्ष 2023 मध्ये एचसीएल कंपनी 34000 फ्रेशर्सना संधी देण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने अन्य आयटी कंपन्यांच्या सापेक्ष अधिकाधिक पगारवाढ दिल्याचा दावा केला आहे. कोविड काळात जगभरात डिजिटल व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला प्रचंड प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. वाढत्या मागणीमुळे कुशल मनुष्यबळ निकडीचे ठरत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणात चढाओढ रंगली आहे. कुशल मनुष्यबळाला आकर्षित करण्यासाठी आणि छोटया शहरांत विस्तारासाठी कंपन्या प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. एचसीएलने देखील समान प्रकारची पावलं उचलली आहेत.