HPCL Recruitment : आघाडीच्या तेल कंपनीत नोकरीची मोठी संधी, निवड प्रक्रिया माहिती आहे का
HPCL Recruitment : हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपनीत तरुणांना नोकरीची मोठी संधी आहे. त्यासाठी आतापासून तयारी केल्यास तुम्हाला करिअर घडविता येईल.
नवी दिल्ली : भारत सरकारच्या तेल उत्पादन कंपन्यांपैकी आघाडीच्या हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये (HPCL Recruitment 2023) तरुणांना नोकरीची संधी आहे. पण त्यासाठी तुम्ही उच्च शिक्षित असणं आवश्यक आहे. रसायनशास्त्र, मायक्रोबायलॉजी, अभियांत्रिकी या शाखांमध्ये पी.एचडी मिळविलेल्या तरुणांना त्यांचे करिअर घडविण्याची संधी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रिसर्च असोसिएट या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुकांना कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. कंपनीच्या संकेतस्थळावर अधिकची माहिती मिळविता येईल.
या पदासाठी भरती यासंबंधीच्या जाहिरातीत उल्लेख केल्याप्रमाणे पी.एचडी किंवा एम.टेक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बेंगळुरूमधील कंपनीच्या एचपी ग्रीन आर अँड डी सेंटरमध्ये नियुक्ती देण्यात येईल. रिसर्च असोसिएट या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. फिक्स्ड टर्म बेसिसवर पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळेल. एका वर्षासाठी ही निवड असेल. आवश्यकतेनुसार, उमेदवाराचे काम पाहून नियुक्तीचा कालावधी एक वर्ष वाढू शकतो. रिसर्च असोसिएट या पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 1 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
या विषयात हवे उच्चशिक्षण रिसर्च असोसिएट या पदासाठी उमेदवाराकडे बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, अॅनॅलिटिकल अँड ऑरगॅनिक केमिस्ट्री,पॉलिमर्स, पॉलिफिन, पेट्रोकेमिकल्स, कॅटलसिस, मटेरियल्स/ नॅनो मटेरियल्स, केमिस्ट्री, बॅटरी रिसर्च, मेमब्रेन सेपरेशन अँड अॅडसोरेप्टिव्ह सेपरेशन या विषयात पीएचडी आवश्यक आहे.
या विषयात इंजिनीअरिंग केमिकल इंजिनिअरिंग, कम्बशन अँड एमिशन इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग , थर्मल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कोरिसन स्टडीजमध्ये मेटलर्जी इंजिनीअरिंग यापैकी एका विषयात उमेदवार निष्णात हवा. म्हणजे त्याच्याकडे पीएचडी हवी.
एम.टेकसाठी संधी थर्मल इंजिनीअरिंग किंवा पॉलिमर/ प्लास्टिक इंजिनीअरिंग या विषयात एम. टेक करणाऱ्या उमेदवारांना पण रिसर्च असोसिएट्स पदासाठी अर्ज करता येईल. पण त्यांच्याकडे कमीत कमी एक वर्ष काम केल्याचा अनुभव गाठीशी हवा.
वयाची अट रिसर्च असोसिएट्स पदासाठी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवाराचं वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावं, अशी अट आहे. पण प्रवर्गनिहाय आरक्षणात सूट, सवलत आहे. संबंधित संकेतस्थळावर वयाच्या शिथिलतेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.
पगाराची एकदम चंगळ निवड झालेल्या उमेदवारांना सर्वात आधी मेडिकल फिटनेस टेस्ट देणे बंधनकारक आहे. कंपनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ही चाचणी करण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 65,000 ते 85,000 रुपये यादरम्यान स्टायपेंड देण्यात येईल.
ऑनलाईन जाण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन, सूचना वाचाव्यात. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा. त्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटोची स्कॅन प्रत जतन करुन ठेवावी.