मुंबई : ‘भाई ये तजुर्बा भी कौनो चीज होवे है’ असा एक गाजलेला चित्रपट संवाद आपल्याला बरेच काही सांगून जातो. जिवनात पैसाचं सर्व काही नाही आणि पैशाशिवाय ही जीवनात अर्थ नाही अशा कात्रीत चाकरमानी जगतो. पण रोजची एक छोटीशी बचत तुम्हाला बघता बघता कोट्यवधी करु शकते. तुमच्या चाकोरीबद्ध आयुष्यात अर्थभान तुम्हाला श्रीमंत करु शकते. तेही अगदी अत्यंत कमी बचतीत, फक्त सातत्याने ही बचत न चुकता करायची. जर तुम्ही दररोज फक्त 20 रुपयांची बचत कराल तर निवृत्तीपर्यंत तुम्ही आरामात करोडपती झालेला असाल. बरं तुम्हाला एकदाच मोठी रक्कम एकरकमी गुंतवायची नाही तर सिस्टीमॅटिक इन्व्हसमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात (Mutual Funds) दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून निश्चिंत रहायचं आहे. 20 ते 25 वर्षांनंतर तुमचं कोट्याधीश होण्याचं स्वप्न पूर्ण झालेले असेल.
म्युच्युअल फंडात रोज केवळ 20 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते. भट्टी जमली तर तुमचे 10 कोटी रुपये कुठेच गेले नाही. फक्त त्यासाठी योग्य गुंतवणूक योजना शोधून त्यात एसआयपी द्वारे गुंतवणूक करावी लागेल. महिन्याकाठी फक्त 500 रुपयांची ही बचत तुम्हाला कंपाऊंडिंगच्या बळावर श्रीमंत करेल. म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक 25 वर्षांनी जबरदस्त परतावा देईल.
योग्यवेळी आणि योग्य वयात दामाजी करील काम हे सूत्र लक्षात घेतलं तर तुम्हाला उतारवयात अर्थार्जनासाठी दगदग करावी लागणार नाही. जर तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी रोज 20 रुपयांची बचत केली तर महिन्याकाठी तुमच्या हातात 600 रुपये येतात. ही रक्कम पुढील 40 वर्षे न चुकता जमा केल्यास तुम्ही मालामाल होऊ शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 40 वर्षांनी तुम्हाला 1.88 कोटी रुपये मिळतील तर तुमची गुंतवणूक असेल 2,88,000 रुपये इतकी आणि याच योजनेत 20 टक्के वार्षिक परताव्याने तुमची रक्कम होईल तब्बल 10.21 कोटी रुपये, तेही 40 वर्षांमध्ये हा चमत्कार दिसून येईल.
आता तुम्ही म्हणाल एवढं कुठं रिटर्न मिळतात का भाऊ, तर चांगले रिटर्न मिळतात. पण तुमच्या मनातील शंका गृहीत धरु. फक्त 12 टक्के वार्षिक परताव्याने तुम्ही दररोज 30 रुपये बचत केलेल्या आणि मासिक 900 रुपयांच्या गुंतवणुकीवर ही 1.07 कोटी रुपये मिळतील. तर 40 वर्षांत तुम्ही गुंतवलेली रक्कम 4,32,000 रुपये इतकी असेल. हा चमत्कार घडेल अर्थातच कंम्पाऊंडिंगमुळे. छोट्या बचतीला मोठ्या रक्कमेत परतावा देण्याचं कसब कंपाऊंडिंगमध्ये आहे. तुमचा अभ्यास आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतल्यास तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जो नफा होतो, तो पुन्हा पुन्हा गुंतवणे या प्रक्रियेला कंपाऊंडिंग म्हणतात. यामध्ये तुमच्या मुळ रक्कमेवर व्याजा वर व्याज मिळते आणि तुमची रक्कम पटीने वाढते. कंपाऊंडिंगचा खरा फायदा कमी वयात गुंतवणूक केल्यास मिळतो. त्यामुळे याप्रकारच्या गुंतवणुकीसाठी 5 ते 10 नव्हे तर 20 ते 25 वर्षांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले पाहिजे.तर जोरदार परतावा मिळू शकतो. हा परिस तुमच्या मुद्दलाला लागला की तुम्ही कोट्याधीश होणार.