पुणे : आरोग्य विभागातील 6 हजार पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. आरोग्य विभागाकडून गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आरोग्य विभागावर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की देखील ओढावली होती. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया, परीक्षेतील गोंधळामुळं विद्यार्थी हायकोर्टात गेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरोग्य भरती परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आरोग्य भरतीत झालेल्या गोंधळाबाबत चौकशी करून परीक्षा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. एमपीएससी समन्वय समितीनं अॅड. विशाल कदम यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
आज किंवा उद्या याचिकेवर सुनावणी
आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील गोंधळ, परीक्षेचा पेपर फुटल्याचं प्रकरण यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्यार्थी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी न्यासा कंपनीकडे देण्यात आलेली होती. न्यासा कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळं आरोग्य विभागाला परीक्षा ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावून घ्यावी लागली होती. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी देखील गोंधळ झाला होता. आरोग्य विभागाच्यावतीनं आयोजित करण्यात आलेली भरती परीक्षा रद्द करत न्यासा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
इतर बातम्या:
MPSC exam aspirants file petition to cancel Health Department Exam at Bombay High Court Aurangabad Bench