Yavatmal Boy Drowned : यवतमाळमध्ये नदीवर हातपाय धुताना पाय घसरला, डोहात बुडून मुलाचा मृत्यू
इजारा येथे शेतातून खत टोबून मित्रांसोबत घराकडे परत येत असताना हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून ओम नदीच्या डोहात पडला.
यवतमाळ : नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एका मुला (Boy)चा नदीच्या डोहात पडून मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी यवतमाळमध्ये घडली आहे. ओम प्रल्हाद चव्हाण (16 रा. यावली) असे मयत मुलाचे नाव आहे. इजारा येथे शेतातून खत टोबून मित्रांसोबत घराकडे परत येत असताना हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून ओम नदीच्या डोहात पडला. आपत्कालीन पथकाकडून कालपासून नदीत त्याचा शोध सुरु होता. अखेर आज मृतदेह (Deadbody) आढळून आला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हातपाय धुवत असताना तोल जाऊन पाण्यात पडला
मयत ओम याने नुकतेच दहावी पास करुन अकरावी इयत्तेत प्रवेश घेतला होता. रविवारी तो शेतात खत टोबून मित्रांसोबत घरी चालला होता. याचदरम्यान वाटेत नदीवर हातपाय धुण्यासाठी थांबला. हातपाय धुवत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या डोहात पडला. पाण्यात बुडून ओमचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. आपत्कालीन पथकाने मुलाचा शोध सुरु केला. मात्र रात्र झाल्याने त्यांना शोधकार्यात अडथळा येत होता. आपत्कालीन शोध व बचाव पथकातील किशोर भगत, प्रदीप चव्हाण, धीरज गावंडे, श्रीकांत कासार, सुमित सोनोने, नीरज पातूरकर, अविनाश ढोले, सुभान अली, गिरज मुसळे, संदीप उरकुडे या टीमने शोध मोहीम सुरु केली. परंतु रात्री उशिरापर्यंत ओमचा शोध लागला नाही. शेवटी आज दुपारच्या सुमारास गावातील तरुणांनी काटेरी तारेला दगड बांधून डोहात सोडून शोध घेतला असता ओमचा मृतदेह गळाला लागला. (16 year old boy dies after falling into river in Yavatmal)