ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : बारावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीने चक्क स्वतःचं रक्त (Blood Sale) विकण्याचा प्रयत्न केला. रक्तदान करण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी (Minor Girl crime) गेली होती. रक्तदान केल्यानंतर तिने पैशांची मागणी केली. यामुळे गोंधळून गेलेल्या रक्तदान केंद्रावरील (Blood Donation Centre) इसमानं याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर या मुलीने असं का केलं, याचा धक्कादायक खुलासा झाला. या मुलीने रक्त दिल्यानंतर पैसे का मागितले, याचं जे कारण सांगितलं, त्याने सगळेच चक्रावून गेले.
अनेकांना स्टाईलिश, नवा आणि चांगल्या ब्रॅन्डचा मोबाईल घेऊन मिरवावसं वाटतं. असं वाटणं काही गैर नाही. पण तसं करण्यासाठी गैरमार्ग जर पत्करला जात असेल, तर तेही योग्न नाही. पश्चिम बंगालमधील एका 16 वर्षीय मुलीनं नेमकं हेच केलं. महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी तिने चक्क स्वतःचं रक्त विकण्याचा प्रयत्न केला.
बारावीत शिकणाऱ्या मुलीने 9 हजार रुपयांच्या स्मार्टफोनची ऑनलाईन खरेदी केली. पण त्याचे पैसे कसे आणि कुठून द्यायचे, असा प्रश्न तिला पडला होता. अखेर तिने आपलं रक्त विकून पैसे कमवण्याचा विचार केला. त्यासाठी ती पश्चिम बंगालच्या बालुरघाट येथील रुग्णालयात गेली. तिथे तिने रक्तदान केलं आणि नंतर ही मुलगी पैशांची मागणी करु लागली.
रक्तदान केल्यानं पैसे मागणाऱ्या मुलीला पाहून रुग्णालयाचा स्टाफही गोंधळून गेला. त्यानंतर याबाबत बाल कल्याण विभागाला कळवलंय. बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठलं आणि मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात सुरुवात केली.
बाल कल्याण विभागाच्या अधिकारी रिता माहतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन खरेदी केलेल्या स्मार्टफोनची या मुलीला लवकरच डिलीव्हरी मिळणार होता. पण तिच्या मोबाईल आल्यानंतर द्यावे लागणारे पैसे नव्हते. पैशांसाठी या मुलीने रक्त विकण्याचा प्रयत्न केला, असं रिता यांनी म्हटलंय. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मोबाईलसाठी या अल्पवयीन मुलीने उचलेललं पाऊल पालकांची चिंता वाढवणारं आहे.
याआधीही अनेकदा महागड्या मोबाईलसाठी हट्ट करणाऱ्या अल्पवयीन मुलांची कशी समजून घालायची, असा प्रश्न पालकांना पडलेला आहे. त्यात आता पश्चिम बंगालमधील मुलीनं केलेल्या कृत्याने अधिकच सवाल उपस्थित केलेत. मोबाईलसाठी किशोरवयीन मुल कोणत्याही थराला जात असून या मुलांना वेळी आवर घालण्याची गरज आता व्यक्त केली जातेय.