Pune Crime : घराच्या वर राहायचा, परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न… पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाची मोठी अपडेट काय?
पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये दोन चिमुकल्या बहिणींची हत्या झाली होती. त्यामागचा हेतू आता उघड झाला असून आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. अवघ्या 9 वर्षाच्या दोन मुलींचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलींच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाला अटक केली आहे
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत नराधमाने हत्या केली. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत त्याच्या शेगावमधून मुसक्या आवळल्या. या घटनेचे संतप्त पडसाद अद्याप उमटत असतानाच पुण्यातही असाच भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये दोन चिमुकल्या बहिणींची हत्या झाली होती. त्यामागचा हेतू आता उघड झाला असून आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. अवघ्या 9 वर्षाच्या दोन मुलींचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलींच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. अजय दास असे आरोपीचे नाव असून तो 54 वर्षांचा आहे. दोन्ही मुलींच्या हत्येनंतर तो परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातूनच अटक केली आहे.
शेजाऱ्यानेच केला घात, दोघींचा घेतला जीव
पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन चिमुकल्या मुलीच्या हत्येने प्रचंड खळबळ माजली होती. दोन चिमुकल्या सख्या बहिणीचा निर्घृण खून झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या दोघी बहिणी काल दुपारी 1च्या सुमारास त्याच्या घराच्या अंगणात खेलत होत्या, मात्र अचानक त्या गायब झाल्या. बराच वेळ त्या सापडल्या नाहीत, ते पाहून त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी संध्याकाळी 5 च्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. त्या मुली रहात असलेल्या भागात,आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखरे रात्री 10 च्या सुमारास त्यांनी मुलींच्या राहत्या घराची तसेच वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली असता मोठा धक्का बसला. वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रम मध्ये रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. ड्रममध्ये डोकं खाली व पाय वर अशा अवस्थेत दोन्ही मुलींचे मृतदेह होते.
याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात आला असता, घराच्या वर राहणाऱ्या जय दासनेच हे खून केल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातील दास हा त्या मुलीच्या वरच्या मजल्यावरच रहायचा. त्यानेच मुलींवर अतिप्रसंग केला, मात्र घडलेल्या घटनेनंतर त्यांनी आरडाओरडा करून नये, तसेच या घटनेची वाच्यता कुठेही करू नये म्हणून त्यानेच त्या मुलींचा खून केल्याचे उघड झाले. तो परराज्यात पळून जायचा प्रयत्न करत असतानाच ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र आरोपीला पोलीसांनी अटक केली असली तरी नातेवाईकांनी राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली असुन मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित पवारांनी व्यक्त केला संताप
आधी कल्याण नंतर पुणे येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे संतापले असून त्यांनी ट्विट करत या मुद्यावरून संताप व्यक्त केला आहे. ‘ सरकारने प्राधान्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सरकारची पॉवर आणि कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देण्याची गरज आहे’ असे रोहित पवारांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
काय आहे रोहित पवारांचं ट्विट ?
कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच राजगुरूनगरमध्येही अशाच प्रकारे ८ आणि ९ वर्षांच्या सख्या चिमुकल्या बहिणींचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
परभणीप्रमाणे पोलिसी बळाचा गैरवापर झाला नाही पाहिजे पण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकही राहिला पाहिजे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाकही राहिला पाहिजे.. पण तसं होताना आज दिसत नाही आणि आज हे रोखलं नाही तर उद्या ते हाताबाहेर जाऊ शकतं.. म्हणून सरकारने आज प्राधान्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सरकारची पॉवर आणि कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देण्याची गरज आहे.
कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच राजगुरूनगरमध्येही अशाच प्रकारे ८ आणि ९ वर्षांच्या सख्या चिमुकल्या बहिणींचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
परभणीप्रमाणे पोलिसी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 26, 2024