आई-वडिलांचं सतत व्हायचं भांडण, वैतागून दोन बहिणींनी उचललं टोकाचं पाऊल, विष घेत थेट…
स्थानिक नगरसेवकाच्या दोन मुलींनी विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल. घरात सतत होणाऱ्या कौटुंबिक वादांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले अशी शंका व्यक्त होत आहे.
लखनऊ | 4 सप्टेंबर 2023 : घरातलं वातावरण चांगलं, शांत नसेल तर त्याच्या लहान-मोठे सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम होताना दिसतो. मुलं तर त्यामुळे भयभीत होतात. त्यांच्या मनावरही परिणाम होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून तेथे कौटुंबिक वादाला कंटाळून (family dispute) दोन बहिणींनी विषप्राशन (consumed poision) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिलभीतमध्ये रविवारी रात्री हा खळबळजनक प्रकार घडला असून त्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. पूरणपूर पोलिस स्टेशन भागात ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नगरसेवक असीम रझा यांच्या मुली, कशिश (वय 20) आणि मुन्नी (वय 18) या दोघींनीही रविवारी संध्याकाळी विषप्राशन केले. हे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना उपचारांसाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्या दोघींची प्राणज्योत मालवली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या दोघींच्या पालकांचे एकमेकांशी सतत वाद होत असत. कौटुंबिक कारणांवरून ते सतत भांडायचे. रविवारीदेखील त्यांचे असेच मोठे भांडण झाले. त्यांच्या मुली या भांडणाला अतिशय वैतागल्या होत्या, त्यांना वीट आला होता. म्हणूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत विषप्राशन करून स्वत:चं जीवनच संपवलं, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांना याप्रकरणी कोणतीही कारवाई करू दिली नाही. मात्र त्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.