पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, पालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला
मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या भावंडांनी आपला जीम गमावल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे.
मुंबई | 19 मार्च 2024 : मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या भावंडांनी आपला जीम गमावल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे. ही दोन्ही चिमुकली भावंडं रविवारपासून बेपत्ता होती. अखेर पालिकेच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीत ती दोघं मृतावस्थेत आढळून आले. माटुंगा येथील जोसेफ हायस्कूलच्या मागील महर्षी कर्वे गार्डनमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिमुकल्यांच्या कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहिचीनुसार, मृत भावंडांपैकी एकाचं वय ४ वर्ष तर दुसऱ्याचं वय ६ वर्ष आहे. ते दोघे भाऊ असल्याचे समजते. महर्षी कर्वे गार्डन येथील पाण्याची टाकी ही पातळ प्लास्टीकने झाकून ठेवलेली होती. तेथे खेळायला गेलेले हे दोन चिमुकले त्या प्लास्टिकवरून पाण्याच्या टाकीत पडले. रविवार संध्याकाळपासू ते दोघेही बेपत्ता होते. बराच वेळ ते न सापडल्याने पालकही कसून शोध घेत होते. अखेर सोमवारी पाण्याच्या टाकीत त्या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने पालिकेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून त्यामुळे एका कुटुंबाला आपली दोन मुलं गमवावी लागली आहेत. त्यांच्या घरावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. पालिकेचा हलगर्जीपणा त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असून नागरिक संतापले आहेत.