घरच्यांसोबत फिरून आले, आणि कारमध्ये खेळू लागले… अचानक आग लागल्याने दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
छोटेसे बहीण-भाऊ काही वेळापूर्वीच घरच्यांसोबत फिरून आले. नंतर घरासमोर गाडी पार्क करून सगळे मोठे आत गेले. मात्र ते दोघे चिमुकले बाहेरच खेळत होते. तेवढ्यात जोरजोरात आवाज आला आणि सगळ्यांनी बाहेर धाव घेतली तर कारला आग लागली होती आणि आतमध्ये... नेमकं काय घडलं तिथे ? वाचा सविस्तर..

पाटणा | 19 डिसेंबर 2023 : आयुष्य अतिशय क्षणभंगुर आहे. आत्ता हसताखेळता असलेला माणूस पुढच्या क्षणी कसा असेल किंवा त्याच्यासोबत काय होईल, हे कोणालाच माहीत नाही. ध्यानीमनीही नसताना अशी एखादी घटना घडते की बघता-बघता समोरचा माणूस कोसळतो आणि आप्तांपुढे शोकाशिवाय दुसरं काहीच उरत नाहीत. अशीच एक अतिशय धक्कादायक आणि शोकाकुल करणारी बातमी बिहरारमध्ये घडली. थोड्या वेळापूर्वीच आई-वडील आणि नातेवाईकांसोबत कारमधून फिरून आलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना पाटणा येथे घडली.
कारमध्ये खेळणारे दोन चिमुकले भाऊ-बहीण खेळत होते, पण अचानक कारला आग लागली आणि त्यातच होरपळून दोघांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असून त्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खाला तर पारावर उरला नाही. काही वेळापूर्वीच हसणारी आपली मुलं निचेष्ट अवस्थेत पाहून त्यांच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
नेमकं काय झालं ?
बिहारची राजधानी पाटणा येथील मसौढी भागात ही दुर्दैवी घटना घडली. तेथे एका घरासमोर उभ्या असलेल्या ऑल्टो कारला अचानक आग लागून त्यामध्ये खेळणाऱ्या दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. गौरीचक ठाणे क्षेत्रातील सोहगी रामपूरमध्ये हा प्रकार घडला. रामपूरमधील संजीत कुमार हे त्यांच्या कुटुंबियांसह घरात होत. बाहेर त्यांनी त्यांची ऑल्टो कार पार्क केली होती.
संजीत यांचा 8 वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या भावाची 6 वर्षांची मुलगी हे दोघेही बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये बसून खेलत होते. मात्र तेवढ्यात कारचा दरवाजा आतून लॉक झाला. या गोष्टीची कोणालाच खबरबात नव्हती. तेवढ्यात कारमधून अचानक धूर येऊ लागला. आजूबाजूच्या लोकांच्या गोंधळामुळे घरच्यांनी बाहेर धाव घेतली तेव्हा त्यांना कारला आग लागलेली दिसली. आणि त्यांची दोन्ही मुलं होरपळून कारमध्येच बेशुद्धावस्थे पडलेली होती. हे पाहून एकच गोंधळ माजला. काय करावं, कोणालाच काही कळेना. अखेर कोणीतरी प्रसंगावधान राखून कारची काच कशीबशी फोडली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. मुलांना कसंबसं बाहेर काढलं पण तोपर्यंत ते मोठ्या प्रमाणात होरपळले होते. कुटुंबियांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेले , मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तीन महिन्यांपूर्वीच घेतली होती कार
गौरीचक पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत होरपळल्यामुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. मात्र कारला ही आग नेमकी कशी लागली, ते अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान कुटुंबातील एक सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच ही सेकंड हँड कार खरेदी केली होती. ही दुर्दैवी घटना घडण्याच्या काही काळ आधीचे ते सर्वजण बाहेर फिरून आले होते आणि नंतर घराबाहेर कार पार्क करून ते आत गेले. पण दोन्ही मुलं कारच्या आत बसूनच खेळत होती. तेव्हाच आग लागल्याने दोघांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.