आई-वडील लग्नावरून परतले, दरवाजा उघडून पाहिलं तर काय ? मुलीच्या कृत्याने सर्वच हादरले…
बेसबॉल खेळाडू असलेल्या या तरूणीने जे कृत्य केलं त्यामुळे तिचं हसतं-खेळतं घर उध्वस्त झालं आहे.
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथील संजीवनी नगर पोलीस ठाण्यांतर्गत गंगासागर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय बेसबॉल महिला खेळाडूने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत गंगा सागर येथे भाड्याच्या घरात राहत होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना तातडीने याबाबत कळवण्यात आले. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच संजीवनी नगर पोलिस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे.
आई-वडील लग्नाला गेले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हरनाम हे त्यांची पत्नी आणि मुलीसोबत गंगासागर येथे राहतात. त्यांची लेक ही मानकुंवरबाई महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. तसेच ती राष्ट्रीय स्तरावर बेसबॉलही खेळत असे. तिने गुजरात, राजस्थान, देवास, उज्जैन येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला होता. 4 जून रोजी हरनाम हे त्यांच्या पत्नीसोबत एका लग्नासमारंभासाठी गेले होते. तेव्हा त्यांची मुलगी घरात एकटीच होती.
तपासात गुंतले पोलिस
सोमवारी रात्री ते लग्नावरू घरी परत आले तेव्हा त्यांनी दार वाजवले, मुलीला आवाजही दिला. मात्र बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी जोर लावून दार उघडले असता, समोर त्यांची तरूण मुलगी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ते दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मृत तरूणीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तिने हे कृत्य का केले, तिला काही त्रास होता का , या कारणांचा पोलिस तपास करत आहेत.