कोपरगावात भगर खाल्याने 21 जणांना झाली विषबाधा; अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या दोन दिवसांत उपवासात भगरीची खिचडी खाल्याने या 21 जणांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या रहिवाशांमध्ये कोपरगाव शहरात आठ, तळेगाव मळे येथील सहा तर वारी येथील आठ अशा महिला आणि पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपवासात भगरीची खिचडी (Bhagar Khichdi) खाल्याने 21 जणांना विषबाधा (Poisoning) झाली. कोपरगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहर, तळेगाव मळे तसेच वारी अशा विविध परिसरात विषबाधा झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपासून सापडले 21 बाधित
विषबाधा झालेल्या पहिल्या रुग्णाला उलट्या व इतर प्रकारचा गंभीर त्रास सुरु झाला. त्याची बातमी परिसरात पसरत नाही तोच एकापाठोपाठ एक 21 बाधीत आढळले आहेत.
गेल्या दोन दिवसांत उपवासात भगरीची खिचडी खाल्याने या 21 जणांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या रहिवाशांमध्ये कोपरगाव शहरात आठ, तळेगाव मळे येथील सहा तर वारी येथील आठ अशा महिला आणि पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
उलट्या, जुलाब, मळमळचा त्रास
विषबाधा झालेल्या रहिवाशांना विविध प्रकारचा त्रास झाला. या सर्व रुग्णांना उलट्या, जुलाब, मळमळ, थरकाप होणे, चक्कर येणे अशा प्रकारच्या त्रासाने हैराण केले. मात्र, ही सौम्य लक्षणे असल्याने तात्काळ शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
नंतर अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळीच उपचार झाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी
भगर खाल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची कोपरगाव पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ज्या भगरीमुळे विषबाधा झाली, तिचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सध्या कोपरगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगरीची विक्री होत आहे. भगरीचे पीठ विकू नये असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा यांनी व्यापारी आणि किराणा दुकानदारांना केले आहे.