उत्तर प्रदेश : भरधाव वेगामुळे सहा जणांचा बळी गेला आहे. फिरोजाबाद येथील आग्रा लखनौ एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. एक भरधाव बस थेट दरीत कोसळली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात सहा जणांनी जीव गमावला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. एकूण 45 ते 50 प्रवासी बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
पंजाबमधील लुधियाना वरुन रायबरेली इथं जाण्यासाठी प्रवासी बस निघाली होती. पण भरधाव बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस एक्स्प्रेसवर पटली होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 6 जण ठार झाले असून 22 जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसंच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना मदतकार्य करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत. सध्या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
22 injured & six killed including a woman & a minor after a driver of a speeding bus lost control of the vehicle on Agra-Lucknow expressway & flipped several times before plunging into a farm field under Nagla Khangar police limits of #Firozabad.#UttarPradesh pic.twitter.com/o7u0amSi5L
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) December 14, 2022
या अपघातातील मृतांमध्ये 4 पुरुषांचा समावेश असून एक महिला आणि दोघा मुलांवरही काळानं घाला घातला आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. अपघातात ठार झालेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात 15 महिन्यांच्या एका बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 22 वर्षांची एक विवाहित महिलाही ठार झालीय. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
या अपघातात जखमी झालेल्या 22 पैकी 9 जणांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना शिकोहाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर अन्य जखमी प्रवाशांवर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ही बस बाजूला काढली असून या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं आहे.