लखनऊ : निकाहची शॉपिगं करण्यासाठी युवती दोन दिवसांपूर्वी हापुडावरुन आली होती. मित्रासोबत ती हॉटेलमध्ये उतरली होती. पण त्याचवेळी हॉटेलच्या खोली नंबर 209 मध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली. रविवारी हॉटेलच्या रुममध्ये पोलिसांना या युवतीचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी पाहिलं, त्यावेळी मृतदेहाच्या तोंडातून फेस येत होता. मृत युवतीची ओळख पटली आहे. तिचं नाव शहजादी आहे. ती धौलाना हापुडाची निवासी आहे. पुढच्या महिन्यात दिल्लीच्या एका युवकाबरोबर शहजादीचा निकाह होणार होता. पण त्याआधीच ही धक्कादायक घटना घडली.
शुक्रवारी शहजादी निकाहची शॉपिंग करण्यासाठी म्हणून मित्र अजरुद्दीन सोबत घरातून बाहेर पडली. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास डासना येथील अनंत हॉटेलमध्ये ती मुक्कामासाठी म्हणून आली. यावेळी मित्र अजरुद्दीन तिच्यासोबत होता. गाझियाबाद येथे हे हॉटेल आहे. हॉटेल स्टाफने दोघांना खोली नंबर 209 दिला. त्याच खोलीत दुसऱ्यादिवशी सकाळी शहजादीचा मृतदेह मिळाला. युवतीसोबत हॉटेलमध्ये थांबलेल्या अजरुद्दीननेच शहजादीच्या भावाला दानिशला फोन करुन ही माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.
एकाच हॉटेलमध्ये अशा दोन घटना
त्यांनी हॉटेलच्या खोली नंबर 209 मधून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. शहजादीचा मृत्यू नैसर्गिक नसून ही हत्या आहे, असा आरोप तिच्या भावाने म्हणजे दानिशने केला. शहजादीच्या मृत्यूसाठी त्याने अजरुद्दीनला जबाबदार धरलय. अजरुद्दीन शनिवारी रात्रीच हॉटेलची चावी स्टाफच्या हातात देऊन पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्येससह वेगवेगळ्या अँगलने पोलिसांनी तपास सुरु केलाय. याआधी सुद्धा डासना येथील रोहन एनक्लेव येथील याच अनंत हॉटेलमध्ये एका युवतीचा मृत्यू झालाय. आता दुसर प्रकरण समोर आलय. आता दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे.