Nagpur Crime : डुप्लीकेट चावीच्या मदतीने बाईक चोरून व्हायचे पसार अन् दुसऱ्या राज्यात नेऊन…
डुप्लीकेट चावीच्या मदतीने बाईक चोरून दुसरीकडे विकणाऱ्या तिघांना अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ३० बाईक्स जप्त केल्याचे समोर आले आहे.
नागपूर | 6 सप्टेंबर 2023 : आजकाल राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल असून नागपूरमध्येही (nagpur) गुन्ह्यांच प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये चोरट्यांनी धूमाकूळ घातला असून दुचाकी अथवा बाईक चोरीला (bike theft) गेल्याच्या अनेक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन महिने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर शहरातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे.
मध्य प्रदेशमधून यायचे चोरटे
शैलेंद्र नायक, राजेश भलावी, मनीष बिसेन असं आरोपींचं नाव आहे. ते तिघेही मध्य प्रदेशातील शिवनी येथील रहिवासी आहेत. सीमा लागून असल्यानेच ते मध्य प्रदेशातून नागपूरमध्ये यायचे. त्यांच्याकडे काही डुप्लीकेट चाव्या होत्या. ज्याने ठराविक कंपनीच्या दुचाकी सुरू व्हायच्या. त्यामुळे हे तिघेही स्प्लेंडर आणि पॅशन प्रो गाडीवर नजर ठेवायचे. ती दिसली रे दिसली की त्यांच्याकडे असलेल्या डुप्लीकेट चावीने ते बाईक सुरू करायचे आणि पसार व्हायचे.
हे चोरटे, चोरलेल्या त्या गाड्या घेऊन मध्य प्रदेशमध्ये जायचे आणि तेथील ओळखीच्या लोकांना या बाईक्स विकायचे असे तपासात उघड झाले आहे. दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांचे पथक गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करत लक्ष ठेवत होते. अखेर या तीनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीस हून अधिक बाईक्स आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. चोरी झालेल्या बाईक्सपैकी 15 बाईक्सच्या मालकांची ओळख पटली असून उर्वरित वाहनांबद्दल माहिती गोळा केली जात आहे.