Wardha Crime : बंदुकीचा धाक दाखवून, कारसह कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक

चोरट्यांनी नागपूर - हैद्राबाद मार्गावर नागरिकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याची कार थांबवून रोख रकमेसह कार पळवणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत.

Wardha Crime : बंदुकीचा धाक दाखवून, कारसह कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक
| Updated on: Sep 08, 2023 | 9:57 AM

वर्धा | 8 सप्टेंबर 2023 : राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे (crime news) नागरिक अतिशय धास्तावले आहेत. दररोज काही ना काही बातमी समोर येत असते. अशीच एक लुटीची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपूर -हैद्राबाद मार्गावर चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत कोट्यावधींच्या रोख रकमेसह कार (car and cash looted) पळवून नेल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मात्र याप्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बुधवारी संध्याकाळी नागपूर – हैद्राबाद मार्गावरील पोहणा शिवारात लुटीची ही घटना घडली. पीडित इसम नागपूरहून हैद्राबादच्या दिशेने कारने निघाला असताना मागून आलेल्या कारने त्याला ओव्हरटेक केले. पुढे जाऊन कार थांबवली आणि कारमधील तिघेजण खाली उतरून त्यांनी मागच्या कारमधील इसमाला बंदुकीचा धाक दाखवत थांबवले. त्यांनी त्याच्याकडून साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि कार दोन्ही लुटली आणि ते फरार झाले. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत काही रोख रक्कम हस्तगत केली.