गिरीष गायकवाड, मुंबई : आताच वर्ल्ड कप 2023 स्पर्धा पार पडली, फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं. प्रमुख शहरांमध्ये सामने होते यामधील भारत-पाकिस्तान सामन्याची भारतीय आतुरतेने वाट पाहत होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला होता. मात्र या सामन्याआधी तिकिटांचा काळाबाजार झाल्याचं पाहायला मिळाला, पोलिसांनी अनेकांना त्यावेळी अटक केलेली कारण अनेक फसवणुकीची प्रकरणही समोर आली होतीत. अशातच शिंदे गटातील एका नेत्याच्या पत्नीचीही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट देतो सांगत शिंदे गटातील नेते विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांची फसवणूक झाली. या तिकिटासाठी त्यांना तब्बल 35 लाख रूपयांचा गंडा घालण्यात आलेला. सामन्याआधी त्यांना तिकिटे तर नाहीच मिळाली त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत.
अनेक दिवस झाल्यावर आरोपी पैसे परत करत नव्हता, शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सर्व काही प्रकार पोलिसांच्या कानावर घातला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपली सुत्र हलवली आणि या प्रकरणामध्ये सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना ताब्यात घेतलं.
सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला हे प्रकरणामध्ये दोषी आढळले, पोलिसांनी यामधील सौरभ निकम मीरारोड या ठिकाणी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला व्यंकट मंडाला हा फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, वर्ल्ड कपमधील तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाल्याचं अनेक क्रीडा प्रेमींनी सोशल मीडियावर सांगितलं, काही भामट्यांनी तिकिटांच्या नावाखाली अनेकांना चुना लावला आहे.