3 राज्यं, 12 दिवस पाठलाग… 380 कोटींची फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक, अभिनेता अनू कपूर यांचीही केली होती फसवणूक
गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 380 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अटक केली आहे. अंबर दलाल असे आरोपीचे नाव असून गेल्या 12 दिवसांपासून पोलिस त्याचा 3 राज्यात पाठलाग करत होते.
गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 380 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अटक केली आहे. अंबर दलाल असे आरोपीचे नाव असून गेल्या 12 दिवसांपासून पोलिस त्याचा 3 राज्यात पाठलाग करत होते. अखेर त्याला उत्तराखंडमधून बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीने सुमारे एक हजार गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा संशय असून आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत. त्यामध्ये अभिनेते अनु कपूर यांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपी अंबर दलाल मुंबईतून फरार झाला. तेथून पळाल्यानंतर तो गुजरात, राजस्थान व उत्तराखंडमध्ये वास्तव्य करत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
काय आहे प्रकरण ?
ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणुकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली. त्यामुळे फसवणुकीची रक्कम ३८० कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत.
फिर्यादींच्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने तिची ओळख अंबर दलालशी करून दिली. त्याने तिला गुंतवणुकीवर आकर्षक नफ्याचे आमिष दाखवले. तसेच देऊ केला. तसेच दर महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पैसे काही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल होणाच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मार्च रोजी अंबर दलाल हा फरार झाला. पोलिसांनी जुहू, अंधेरी व दहिसर परिसरात त्याचा पोलिसांनी शोध घेतला. पण तोपर्यंत दलाल गुजरातला पळाला होता. त्याच्या मागावर पोलीस पथक गुजरातला गेले. काही दिवस गुजरातमध्ये राहिल्यानंतर आरोपी राजस्थानला पळाला. तेथून तो उत्तराखंड येथे पळाला. या काळात त्याने सहा हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. अखेर पोलिसांनी उत्तराखंडमधून त्याला बेड्या ठोकल्या.