मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक, आरोपींमध्ये सैराट फेम ‘या’ अभिनेत्याचाही समावेश
नेवासा तालुक्यातील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना मंत्रालयातून बनावट नावाने कॉल करून सामाजिक न्याय विभागात काम करत असल्याचे भासवत एका भामट्याने पाच लाखांची मागणी केली.
अहमदनगर : मंत्रालयात नोकरी (Job) मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानंतर यामध्ये मोठे रॅकेट (Racket) असल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी आतापर्यंत राहुरी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) झाली आहे. लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराटमधील प्रिन्स अर्थात सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
या प्रकरणी आरोपी दत्तात्रय क्षिरसागर, आकाश शिंदे आणि ओमकार तरटे या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्रालयातून बनावट कॉल करुन पाच लाखाची मागणी
नेवासा तालुक्यातील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना मंत्रालयातून बनावट नावाने कॉल करून सामाजिक न्याय विभागात काम करत असल्याचे भासवत एका भामट्याने पाच लाखांची मागणी केली. 3 सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर त्यापैकी दोन लाख रुपये रोख दिले.
जॉईन ऑर्डर मिळाल्यानंतर तीन लाख देण्याचे ठरले
जॉईन ऑर्डर मिळाल्यानंतर उर्वरीत तीन लाख देण्याचे ठरले. त्यानंतर तीन दिवसांनी आरोपी दत्तात्रय क्षिरसागर याने ऑर्डर आणल्याचं सांगत तीन लाख रूपये द्या आणि ऑर्डर घेऊन जा असं सांगितलं.
तरुणाला संशय आल्याने पोलिसात तक्रार दिली
यासाठी त्याने फिर्यादिला राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावले. यावेळी संशय आल्याने महेश वाघडकर यांनी पैसे न देता पोलीस स्टेशन गाठले आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दत्तात्रय क्षिरसागर याला राहुरीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी दत्तात्रय याला साथ देणारे आणि बनावट शिक्के तयार करणारे आकाश शिंदे आणि ओमकार तरटे यांना संगमनेर येथून अटक केली.
सैराट फेम प्रिन्सचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड
अटकेतील आरोपींनी या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याने त्याला देखील अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गैरवापर
अभिनेता सुरज पवार हा देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून कामासाठी शिक्के लागत असल्याचं सांगितलं. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गैरवापर केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. त्यामुळे आता अभिनेता सुरज पवार यालाही याप्रकरणी अटक केली जाणार आहे.