मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील वांद्रे येथील गजधर रोड भागात एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन आठ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी 6.15 च्या सुमारास हा स्फोट झाला. वांद्रे येथील गजाधर रोड परिसरात वन प्लस स्ट्रक्चर असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर स्फोटाच्या घटनेत घरातील आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , वांद्रे येथील गजधर रोडवर असलेल्या घरात शनिवार (18 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागली. आगीमुळे घरातील तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर ठेवलेले इलेक्ट्रिक सामान, वायरिंग तसेच कपडे हे जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तताडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत घरातील आठ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण आगीमुळे २५ ते ४० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर सर्जिकल वार्डमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशसाकडून देण्यात आली आहे. दरम्यान एका रुग्णाने रुग्णालयात दाखल होण्यासच नकार दर्शवला
जखमींची नावे :
1) निखिल दास, 53 वर्षे, 35% भाजला
2) राकेश शर्मा, 38 वर्षे, 40% भाजला
3) अँथनी थेंगल, 65 वर्षे, 30% भाजला
4) कालीचरण कानोजिया, 54 वर्षे, 25% टक्के भाजला
5) शान अली झाकीर अली सिद्दीकी, 31 वर्षे, 40% भाजला
6) समशेर, 50 वर्षे, गंभीर जखमी, सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल
7) संगीता, 32 वर्षे, किरकोळ जखमी
8) सीता, 45 वर्षे, रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला