ख्रिसमससाठी गावी निघाले, आलेच नाहीत, अख्खी कार… एकाच कुटुंबातील 6 जण ठार; अख्ख्या गावावर शोककळा
सांगलीमध्ये एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.
बंगळुरू येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हादरवणारी दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटून कारवर आदळल्याने कारच पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण मृत्यूमुखी पडलेत. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला . ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जत येथील गावाला निघालेल्या हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणाच होत्याचं नव्हतं झालं. मृतांमध्ये तीन मोठ्या माणसांचा तर दोन लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे . एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रम इगाप्पागोळ ( वय 46) हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते. ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. ख्रिसमसच्या सुटीनिमित्त चंद्र इगाप्पागोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्याच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला. त्यामुळे त्यांची कार कंटेनरखाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचा मृत्यू झाला. बंगळुरु जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली.
चंद्रम इगाप्पागोळ (वय 45), त्यांची पत्नी धोराबाई (वय 40) मुलगा गण (वय 16), मुली दिक्षा (वय 10), आर्या (वय 6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली. यामुळे गावावर एकच शोककळा पसरी असून कुटुंबावर तर दु:खाचा मोठा आघात झाला आहे. ाप्रकरणीनेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.