दुर्दैवी अपघात ! लिफ्ट कोसळून 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, कुठे घडली ही धक्कादायक घटना ?
बहुमजली इमारतीतील लिफ्ट खाली कोसळल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. तार तुटल्याने लिफ्ट खाली कोसळल्याचे समजते.
नोएडा | 4 ऑगस्ट 2023 : बहुमजली इमारतीतील लिफ्ट खाली (lift collapsed) कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला (death of woman) जीव गमवावा लागला. गुरूवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील पारस टिएरा सोसायटीमध्ये हा दुर्दैवी अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय सुशीला देवी या लिफ्टमध्ये असतानाच लिफ्टची तार तुटली. या अपघातानंतर सुशीला देवा यांना तातडीने फेलिक्स रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती, मात्र मृत्यूचे प्रमुख कारण हे पोस्टमॉर्टमनंतरच समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
लिफ्ट कोसळल्याने बेशुद्ध झाली महिला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तार तुटल्याने ही लिफ्ट कोसळली. गुरूवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. लिफ्टमध्ये वृद्ध महिला अडकली होती, जी त्यानंतर बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना उपचारांसाठी जवळच्याच रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
ही सोसायटी 28 मजली असून लिफ्ट 24 व्या मजल्यावरून कोसळली, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर सोसायटीमध्ये लोकांची एकच गर्दी जमा झाली होती आणि त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी लिफ्टचा मेंटेनन्स राखणारे तसेच बिल्डरची चौकशी सुरू केली आहे.
लिफ्ट उघडण्यास लागली 45 मिनिटे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला सुशीलादेवी, त्यांचा मुलगा व सुनेसोबत या इमारतीत रहात होत्या. घटनेच्या दिवशी त्या संध्याकाळी लिफ्टमध्ये एकट्याच होत्या तेव्हा तार तुटून लिफ्ट खाली कोसळली. सुरक्षाकर्मी आणि मेंटेनन्स विभागाच्या कर्मचारी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत होते. सुमारे ४५ मिनिटांनी लिफ्ट उघडली असता सुशीला देवी या बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.