‘या’ पेन कंपनीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; तब्बल 750 कोटींचा घोटाळा, सीबीआयकडून गुन्हा दाखल
विशेष म्हणजे या कंपनीने तब्बल 750 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे.
दिल्ली : देशात सध्या आर्थिक घोटाळ्यांना पेव फुटले आहे. या घोटाळ्यांमध्ये सहभागी झालेले लोक तसेच बड्या कंपन्यांची नावे ऐकून सर्वांना धक्का बसतो आहे. याचदरम्यान सीबीआयच्या कारवाईतून आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एकेकाळी पेन उत्पादनात आघाडीवर असलेली आणि तितकीच लोकप्रिय ठरलेली रोटोमॅक ही कंपनी देखील सीबीआयच्या कचाट्यात सापडली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने तब्बल 750 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. याचवेळी रोटोमॅक पेनच्या चाहत्यांनाही तितकाच मोठा धक्का बसला आहे.
कंपनीची आर्थिक घडी कोलमडली
जवळपास 20 वर्षे बाजारामध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या रोटोमॅक कंपनीची सध्या आर्थिक घडी पूर्णत कोलमडून गेली आहे. याचदरम्यान कंपनीवर 750 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचा पाया आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचे हे प्रकरण इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित आहे. पेन निर्मितीमधील अग्रेसर असलेल्या कंपनीने बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील एक दोन नव्हे तर सात बँकांचे कोट्यावधी रुपये थकवले आहेत.
या बँकांचे एकूण 2919 कोटी थकवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या रकमेमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पैशांचा 23 टक्के इतका हिस्सा आहे.
कागदपत्रांमधील फेरफार उघडकीस
रोटोमॅक कंपनीने कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून घोटाळा केल्याचे समोर आले आहे. घोटाळ्याचा संशय आल्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेने फॉरेन्सिक चाचणी केली. त्या चाचणीमध्ये कागदपत्रांतील फेरफार उजेडात आला.
तसेच लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचाही कुठेही खुलासा करण्यात आला नसल्याचे समजते. या विविध अनियमितेतेमुळे रोटोमॅक कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे.