घरासमोर लघुशंका करण्यास रोखले, तरुणाने केलेल्या गोळीबारात 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पिंटू शर्माला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो नेहमी गावात भांडण करत असे. घटनेच्या दिवशीही तो दारुच्या नशेत गावात फिरता फिरता मोनू सिंग यांच्या घराजवळ आला.
भिंड : घरासमोर लघुशंका करण्यास रोखल्याने चिडलेल्या तरुणाने केलेल्या गोळीबारात 12 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. भिंडमधील कोट गावात ही घटना घडली असून, अन्य दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. मुलाच्या मृत्यूनंतर मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पिंटू शर्मा असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीला दारुचे व्यसन
पिंटू शर्माला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो नेहमी गावात भांडण करत असे. घटनेच्या दिवशीही तो दारुच्या नशेत गावात फिरता फिरता मोनू सिंग यांच्या घराजवळ आला. मोनू यांच्या घरासमोरच पिंटू लघुशंका करत होता. यावेळी मोनू आणि त्यांच्या भावांनी त्याला रोखले.
लघुशंका करताना रोखले म्हणून गोळीबार
रोखल्याच्या रागात पिंटूने सिंग बंधूंना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यानंतर पिंटू आपल्या एका साथीदाराला घेऊन आला आणि मोनू यांच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात घरातील तिघे जण जखमी झाले. जखमींमध्ये 12 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
उपचारादरम्यान 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 12 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.
मृताच्या नातेवाईकाकडून रास्ता रोको
मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी भिंड येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवावा आणि मृताच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.