वडिलांना भेटायला आला होता मुलगा, पण ही भेट अखेरचीच ठरली !
गणेशचे वडिल अनेक वर्षांपासून दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी गणेश वडिलांना भेटण्यासाठी दगडवाडी येथे आला होता. आज माजलगाव कालव्याच्या उजव्या कालव्यात तो पोहायला गेला होता.
बीड / संभाजी मुंडे (प्रतिनिधी) : कॅनॉलमध्ये पोहायला गेलेला 16 वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना परळी तालुक्यातील दगडवाडी शिवारात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी नगरपालिकेचे अग्नीशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाण्यात मुलाचा शोध घेत आहेत. गणेश शिवाजी करवर असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सध्या माजलगाव येथील उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळते. गणेश हा मुळचा परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हटकर वाडी येथील रहिवासी आहे. दगडवाडी येथे वडिलांना भेटायला आला असता दुर्दैवी मृत्यू झाला.
वडिलांना भेटायला दगडवाडी येथे आला होता मुलगा
गणेशचे वडिल अनेक वर्षांपासून दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी गणेश वडिलांना भेटण्यासाठी दगडवाडी येथे आला होता. आज माजलगाव कालव्याच्या उजव्या कालव्यात तो पोहायला गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात बुडाला
मात्र कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. अग्नीशमन दल मुलाचा पाण्यात शोध घेत आहे.
गणेशच्या पश्चात एक भाऊ, एक बहिण आणि आई-वडिल असा परिवार आहे. मुळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशचे वडील काही अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करत आहेत.
गणेशला पाण्यात बुडताना पाहून गावकऱ्यांनी त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अग्निशामक विभागाकडून शोधकार्य सुरु आहे.