तृणमूल काँग्रेस खासदाराच्या गाडीची चिमुकल्याला धडक; आईसमोरच मुलाचा दुर्दैवी अंत
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे हा अपघात घडला. गाडीने निष्पाप चिमुकल्याला धडक दिली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार गाडीमध्ये होते.
कोलकाता : बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे. दुचाकीस्वार तसेच इतर वाहनचालक पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार न करता गाड्या चालवतात. त्यातून जीवघेण्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अशा बेफिकीर चालकांच्या यादीत आता व्हीआयपींच्या गाडीचे चालकही सहभागी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या अपघातातून याची प्रचिती आली आहे. तृणमूल काँग्रेस खासदाराच्या गाडीने एका चिमुकल्याला धडक दिली. त्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
या घटनेने बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृत्यू झालेला चिमुकला हा त्याच्या आईसोबत चालत होता. त्याचवेळी अपघात होऊन मुलाचा मृत्यू झाला. निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातावेळी गाडीमध्ये होते खासदार
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे हा अपघात घडला. गाडीने निष्पाप चिमुकल्याला धडक दिली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार गाडीमध्ये होते. अपघात घडल्यानंतर मुलाला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली.
अबू ताहेर खान असे खासदाराचे नाव असून, त्यांच्या गाडीने चार वर्षांच्या चिमुकल्याला धडक दिली. हा चिमुकला त्याच्या आईसोबत बँकेत चालला होता. चिमुकला गाडीसमोर आला. मात्र खासदाराची गाडी भरगाव वेगात होती. त्यामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकावर कारवाईची मागणी
निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या खासदाराच्या गाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मात्र चालकाला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.
संबंधित गाडीही खासदाराची होती, त्यामुळे आरोपी चालकाचा बचाव केला जात आहे का? मुलाचा हकनाक बळी गेल्यामुळे संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुर्शिदाबाद परिसरात जोर धरत आहे.