पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून आली, शेतमजुरी करुन लेकरांना वाढवत होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते
पोटाची खळगी भरण्यासाठी मजुर कुटुंब बीड जिल्ह्यातून साताऱ्यात आले. शेतात काम करुन महिला आपल्या चार मुलांचा उदरनिर्वाह चालवत होती. मात्र एका घटनेने सर्वच संपले.
सातारा / संतोष नलावडे : शेतावर मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. कोरेगाव तालुक्यातील पळशी गावात ही घटना घडली. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरेगाव तालुक्यात पळशी येथील प्रदीप पवार यांच्या शेतात ही घटना घडली. याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील कुटुंब शेतमजुरीसाठी साताऱ्यात आले होते
प्रदीप पवार यांच्या मालकीची बर्गेवाडी येथे 10 एकर शेतजमीन आहे. या शेतात काम करण्यासाठी द्रौपदी होणाजी हातागळे ही महिला आपल्या चार मुलांसह येथे राहते. हातागळे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रहिवासी असून, सध्या ही महिला चार मुली आणि एक मुलगा यांच्यासह पवार यांच्या शेतात राहत होती.
तोल गेल्याने मुलगा शेततळ्यात पडला
सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास द्रौपदी हातागळे यांच्या 9 वर्षाचा मुलगा शेतात असलेल्या शेततळ्यात तोल जाऊन पडला. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. शेतमालक प्रदीप पवार यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कोरेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह तळ्यातून बाहेर काढला.