कल्याण / 18 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये फसवणुकीच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. फसवणूक करण्यासाठी आरोपींचे वेगवेगळे फंडे पाहून पोलीसही चक्रावले आहेत. नुकतीच एक फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एका सायकल दुकानदाराला एका जोडप्याने गंडा घातल्याची घटना घडली. आपण बँकेत कॅशिअर असून, आपली पत्नी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली. मग सायकल बुक केली. त्यानंतर पर्स विसरली सांगून दुकानदाराला चेक देत त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेऊन फरार झाले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 420, 170, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
चक्की नाका कल्याण पूर्व येथील प्रकाश सायकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. महेंद्र बाबुराव यादव नामक व्यक्ती एका महिलेसोबत 24 जून रोजी दुपारी सायकलच्या दुकानात गेला. यादवने आपण बीआय बँकेत कॅशिअर असून, माझी पत्नी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. जोडप्याने दोन सायकल बुक केल्या. त्यानंतर दोन सायकलचे बिल 30 रुपये चेकद्वारे दिले. यानंतर चेक क्लिअर झाल्यानंतर 9 जुलै रोजी गाडी पाठवतो. सायकल पाठवून द्या सांगितले.
दुकानात जायला निघाले आणि महिलेने दुकानदाराला आपण पर्स गाडीत विसरलो असून, मला 10 हजार रुपये द्या सांगितले. त्या बदल्यात तिने 10 रुपयांचा चेकही दिला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा यादव याने फोन करुन अडीच हजार रुपयांची गरज असल्याचे सांगत फोन पे करायला सांगितले. त्याप्रमाणे पुन्हा दुकानदाराने पैसे पाठवले. मात्र पैसे मिळताच आरोपींनी मोबाईल बंद करुन पोबारा केला.
दुकानदार तेव्हापासून वारंवार जोडप्याला फोन लावत आहे. मात्र आरोपींचा फोन लागत नाही. तसेच ते पुन्हा दुकानातही आले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानमालक भावेश चौधरी यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुकान मालकाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. अखेर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.