कुत्रा मागे लागला म्हणून पळत होता, थेट कारलाच धडकला, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
क्लासला जाणाऱ्या मुलाच्या मागे रस्त्यावरील भटका कुत्रा लागला. कुत्र्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन मुलगा रस्त्याने धावत होता. यादरम्यान जे घडलं ते भयंकर.
निनाद करमरकर, TV9 मराठी, बदलापूर : बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुत्रा मागे लागला म्हणून मुलगा रस्त्यावर पळत होता. पळताना आजूबाजूच्या गाड्यांचं देखील भान मुलाला राहिलं नाही. पळत असताना भरधाव कारची मुलाला धडक बसल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून मुलगा पूर्ण शुद्धीत आला नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कॉम्प्युटर क्लासला चालला होता मुलगा
बदलापूरला राहणारा 16 वर्षांचा मुलगा 9 मे रोजी सकाळी 6.30 वाजता कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी घरुन निघाला होता. बेलवली परिसरातील डी अड्डा हॉटेलच्या परिसरात तो आला असता, एक भटका कुत्रा त्याच्या अंगावर धावून आला. त्यामुळे मुलगा जीवाच्या भीतीने रस्त्यावरुन पळून लागला. रस्त्यावरुन पळताना त्याला आजूबाजूच्या गाड्यांचेही भान नव्हते. जीव मुठीत घेऊन पळत असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारने त्याला जोरदार धडक दिली.
अचानक मुलगा समोर आल्याने कारचालकाला ब्रेक लावता आला नाही
अचानक मुलगा समोर आल्याने कार चालकाचे ब्रेक लागले नाहीत आणि त्याने मुलाला जोरदार धडक दिली. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मात्र कार चालकाने स्वतः मुलाला उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अपघाताला कुत्रा कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं. या अपघातानंतर मुलाला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याच्या डोक्याला मार लागल्यानं अजूनही तो पूर्णपणे शुद्धीत आलेला नाही.
एक आठवड्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अपघाताच्या एक आठवड्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू असून, यात कार चालकाची चूक आहे का? हे पडताळून मग पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.