मुंबईहून इचलकरंजीकडे 35 प्रवासी घेऊन जाणारी बस पेटली, दैव बलवत्तर म्हणून…
कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येताच बसचा टायर पेटला आणि बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली.
कराड : मुंबईहून इचलकरंजीकडे 35 प्रवासी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अचानक आग लागली. राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ वराडे हद्दीत ही घटना घडली. तळबीड पोलीस स्टेशन आणि महामार्ग कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. बसमधील सर्व 35 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. काळा आला होता पण दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
खाजगी ट्रॅव्हलची बस मुंबईहून इचलकरंजीला चालली होती
संजय ट्रॅव्हलची खाजगी बस मुंबईहून मुंबईहून इचलकरंजीला चालली होती. या बसमध्ये 35 प्रवासी होते. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येताच बसचा टायर पेटला आणि बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली.
आगीचे वृत्त कळताच पोलीस आणि महामार्ग देखभाल कर्मचारी घटनास्थळी हजर
बसने पेट घेतल्याची माहिती कळताच तळबीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महामार्ग देखभाल कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
कराड नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब बोलावण्यात आला. अग्निशामक दलाने बसला लागलेली आग विझवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर बर्निंग कारचा थरार
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. पालघरमधील सातीवली येथे धावत्या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. सुरतहून मुंबई एअरपोर्टला जात असताना इनोव्हाला आग लागली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. इनोव्हा कारमधील तिन्ही प्रवाशी सुखरूप आहेत. घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.