पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राजाराम डगलारामजी सिरवी असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपींविरोधात कलम 363, 364 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. हरिश चौधरी, राहुल उणेचा, बाळा वाघेरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजाराम सिरवी यांचे लक्ष्मीनगर मारुंजी परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. सिरवी यांनी वाल्हेकरवाडी येथील हरिश चौधरी यांच्यासोबत पैशाचा व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. आणखी पैसे देण्यास व्यापाऱ्याने नकार दिल्याने चौधरी आणि अन्य तिघा आरोपींनी त्यांचे अपहरण केले.
पीडित सिरवी यांनी पैसे देण्याचे कबुल करत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली. यानंतर त्यांनी थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरुन चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तिघा आरोपींना अटक केली आहे.