नवी मुंबई / रवी खरात : ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने कारने पुढे चाललेल्या सहा वाहनांना धडक दिल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सिवूड येथून पामबीचच्या दिशेने सकाळी एक सफेद रंगाची कार चालली होती. यावेळी कार थांबवण्यासाठी कारचालक ब्रेक दाबत होता. मात्र ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबला गेला. यानंतर कार सुसाट वेगात जाऊन पुढे चाललेल्या वाहनांना धडकली. चार मोटारसायकल आणि दोन रिक्षांना कारने जोरदार धडक दिली. यात एक रिक्षा चालक जखमी झाला.
अपघातात कारसह सर्व गाड्यांचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळशी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी एनआरआय पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलाजवळ रात्री टेम्पो आणि बसमध्ये भीषण अपघात झाल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलायन्सचे कर्मचारी होते आणि ताज लाईंड हॉटेल जात होते.