पहिलीला घटस्फोट न देताच दुसरीसोबत बोहल्यावर चढला; अचानक लग्नात पहिली पत्नी धडकली अन्…
घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असतानाच खेमराजने दुसऱ्या लग्नाची तयारी केली. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट होण्याआधीच खेमराजने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे दुसरा विवाह ठरवला.
भंडारा : घरी पत्नी आणि मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात असतानाच पहिली पत्नी थेट लग्नमंडपात धडकली. यानंतर नवरदेवासह लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची एकच तारांबळ उडाली. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील तरुणाचा हा पराक्रम ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेमराज बाबुराव मुल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी खेमराज विरोधात कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कलम 494, 511, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
15 वर्षांपूर्वी झाला होता पहिला विवाह
खेमराज मुल हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासळ गावातील रहिवासी आहे. खेमराज हा पेंटचा व्यवसाय करतो. खेमराजचा 15 वर्षांपूर्वी गावातीलच मुलीसोबत प्रेमविवाह झाले होते.
दोघांमध्ये पटत नसल्याने पतीने घटस्फोटाची केस दाखल केली
लग्नानंतर काही दिवस दोघांचे नाते सुरळीत चालले होते. या दोघांना एक मुलगाही आहे. काही दिवसांनी दोघांमध्ये खटके उडू लागले. दोघांमध्ये सतत भांडण होऊ लागल्याने पतीने पत्नीविरोधात न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली.
घटस्फोट मिळण्याआधीच दुसरा विवाह करण्याच्या तयारीत होता
हे प्रकरण न्यायालयात असतानाच खेमराजने दुसऱ्या लग्नाची तयारी केली. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट होण्याआधीच खेमराजने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे दुसरा विवाह ठरवला. ठरल्याप्रमाणे विवाहाचा दिवस आला. सर्व पाहुणेमंडळी विवाहासाठी लग्नमंडपात हजर झाले.
पहिल्या पत्नीला या विवाहाची माहिती मिळाली अन्…
पत्नीला हा प्रकार कळल्यानंतर तिने लग्नाची तारीख माहीत करून घेत पतीचा डाव उधळण्यासाठी ऐन लग्नात मुलगा, भाऊ आणि बहिणीसह कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये धडकली.
वर-वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला. यानंतर दुसरे लग्न करणाऱ्या पतीला थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खेमराज मुल याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.