वेगेवेगळ्या खोलीत तिघांनी जीवन संपवण्यामागील कारण आलं समोर, 21 जणांविरोधात गुन्हा आणि दहा जणांना अटक केल्यानं उडाली खळबळ
नाशिकच्या सातपुर परिसरात वडिलांसह दोन्ही मुलांनी राहत्या घरात वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामागील कारण पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिक : नाशिकच्या सातपुर हद्दीत दोन मुलांसह वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यानं नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात होती. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांनी आत्महत्या केल्यानं या मागील कारण काय? याबाबत सातपुर पोलीसांनी तपास सुरू केला होता. यामध्ये घरातील महिला कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्याची पाहून वडील आणि दोन्ही मुलांनी वेगवेगळया खोलीस आत्महत्या केल्याचे समोर आल्यानं संपूर्ण शहर हादरलं गेलं होतं. शिरोडे कुटुंबातील वडील दिपक शिरोडे (वय 55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25), लहान मुलगा राकेश शिरोडे (वय 23) यांनी रविवारी दुपारी आपली जीवन यात्रा संपवली होती. फॅनच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सातपुर पोलिसांत याबाबत सुरुवातील आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यावरून पुढील तपास केल्यानंतर सावकाराच्या जाचाळा कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले असून 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
शिरोडे कुटुंबाने व्यवसायाच्या निमित्ताने कर्ज घेतलेले होते, खाजगी सावकाराकडून हे कर्ज घेतल्याने पैशासाठी त्यांना तगादा लावला जायचा, त्यास कंटाळून घरातील पुरुषांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घरातील मोठा मुलगा प्रसाद शिरोडे यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली होती, काही तासांची मुलगी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यात प्रसाद यांची आई आणि दीपक शिरोडे यांच्या पत्नीही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्याचे पाहून घरातील पुरुषांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
सातपुर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खाजगी सावकारी जाच या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 जणांवर हा गुन्हा दाखल केला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
शिरोडे कुटुंब खरंतर देवळा तालुक्यातील उमराणे येथील असून व्यवसायाच्या निमित्ताने ते काही वर्षांपासून नाशिकच्या सातपुर परिसरात राहत होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.