विरार तीन महिला कामगार मृत्यू प्रकरण; बिल्डर, ठेकेदार, आर्टिटेक्चरवर गुन्हा दाखल; दोघांना अटक
विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत अंगावर कोसळून तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे.
विरार : चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी विरारमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत बिल्डर, ठेकेदार, आर्किटेक्चरवर विरार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. यात बिल्डर आणि ठेकेदाराला अटक केली असून, आर्टिटेक्चर मात्र फरार झाला आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. चिराग दोषी (बिल्डर), भरत पटेल (ठेकेदार), उमेश केसरा (आर्टिटेक्चर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत.
कशी घडली घटना?
विरार पूर्व रेल्वेस्थानकाजवळील सुर्या किरण इमारतीच्या रिडेव्हलपमेंटचे काम सुरु आहे. या कामात 5 पार्टनर आहेत. ही इमारत 7 वर्षांपूर्वी रिडेव्हलपमेंटसाठी पाडण्यात आली होती. मागच्या एक महिन्यापासून या इमारतीच्या बेसिमेंटसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. ज्या ठिकाणी खड्डा खोदला त्याठिकाणी सर्वत्र माती होती.
बिल्डरने जमिनीपासूनच सिमेंटचे पिलर उभे करून फाउंडेशन घेणे गरजेचे होते. पण तसे न करता 14 इंच वीटच्या भिंतीचे बांधकाम करून बेसमेंट करत होते. काल मंगळवारी बाजूची माती भिंतीवर पडल्याने ती भिंत तेथील महिला कामगारांच्या अंगावर पडल्याने 3 महिलांचा मृत्यू झाला तर एक महिला कामगार जखमी झाली आहे. राधाबाई नवघरे, लक्ष्मीबाई गव्हाणे, शाहूबाई सुळे अशी मयत महिला कामगारांची नावे आहेत.
नित्कृष्ट कामकाजावर महापालिकेचे दुर्लक्ष
बिल्डर, ठेकेदार आणि आर्किटेक्चर यांच्यावर तर गुन्हे दाखल झाले. पण एवढे निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. त्यावर महापालिकेच्या संबंधित अधिकारी, इंजिनिअर यांचे दुर्लक्ष कसे झाले? हा प्रश्न विचारला जात आहे. एका बिल्डरला अटक केले, पण त्याच्या इतर 4 पार्टनरचे काय? ज्यांचा जीव गेला त्या कामगारांच्या जीवाची नुकसान भरपाई कशी मिळणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.