साडी परिधान केली, श्रृंगार केला; मग दहावीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले, कारण काय?
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव दीपेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करण्यापूर्वी साडी तसेच स्त्रियांचे इतर दागिने व इतर पोशाखही परिधान केला होता.
सिलीगुडी : पश्चिम बंगालमधील एका आत्महत्येच्या घटनेने पोलिसांना चक्रावून टाकले आहे. इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने चक्क साडी परिधान करून आत्महत्येचा मार्ग पत्करला. स्त्रीच्या वेशात जीवन संपवण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, हे कोडे पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे एखाद्या स्त्रीचा किंवा युवतीचा सहभाग आहे का, याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाची पुढील चक्रे फिरवली आहेत. यामागे घातपात नाही ना, याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
आत्महत्येमागील कारणाचा उलगडा नाही
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव दीपेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करण्यापूर्वी साडी तसेच स्त्रियांचे इतर दागिने व इतर पोशाखही परिधान केला होता.
विद्यार्थ्याला यापूर्वीही महिलांच्या पोशाखाबद्दलआकर्षण होते का? तो अशा प्रकारे विक्षिप्त वागायचा का? किंवा त्याला कुठल्या स्त्रीने वा तरुणीने आपल्या जाळ्यात खेचून फसवले होते का? आदी विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.
दहावीत शिक्षण घेत होता
सिलिगुडी महापालिकेच्या हद्दीतील दक्षिण शांतीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दीपेश हा सिलिगुडी बर्दकांत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शाळेमध्ये दहावीत शिक्षण घेत होता. तो कोणत्या कारणातून नैराश्येत गेला आणि आत्महत्येचा मार्ग पत्करला हे अद्याप उघड झालेले नाही.
घरात एकटा असताना केली आत्महत्या
मृत दीपेशच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपेशने राहत्या घरातच गळफास घेतला. त्याच्या या टोकाच्या कृत्याची चाहूल लागताच आसपासच्या लोकांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना दीपेशने गळफास घेतल्याचे आढळून आले.
यानंतर शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या दीपेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दीपेशने आत्महत्या केली की त्याचा घातपाताने मृत्यू झाला, याचा नेमका उलगडा होणार आहे.