एसटी बसमध्येच महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण, सोडवायला गेलेल्या शाळकरी मुलींनाही छेडले
काल सायंकाळी जळगाव जामोदवरून वडोदा येथील मुली आणि मुले बसमध्ये बसून वडोदा येथे जात होते. बस खांडवी स्टॉपवर थांबली असता, तेथील 6 तरुण गाडीत चढले.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या खांडवी बस स्टॉपवर काही मवाली तरुणांनी एका शाळकरी मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व तरुण खांडवी येथील असून बसमध्ये चढून मुलाला मारहाण करत असताना सोडवायला गेलेल्या महाविद्यालयीन मुलींची छेडही काढली. एवढेच नव्हे तर मुलींना मारहाणही करण्यात आली आहे. पीडित मुली ह्या जळगाव जामोद येथील एका खाजगी महाविद्यालयात शिकतात.
मुलींच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी खांडवी येथील 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दखल केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून काही मुली आणि मुले जळगाव जामोद येथे शिक्षणासाठी दररोज बसने प्रवास करतात.
जामोदहून वडोद्याला जात होती बस
दरम्यान काल सायंकाळी जळगाव जामोदवरून वडोदा येथील मुली आणि मुले बसमध्ये बसून वडोदा येथे जात होते. बस खांडवी स्टॉपवर थांबली असता, तेथील 6 तरुण गाडीत चढले. या 6 जणांनी वडोदा येथील धनेश सुनील फुसे या विद्यार्थ्याला मारहाण करायला सुरुवात केली.
तरुणांकडून मुलींची छेडछाडसह मारहाण
यावेळी गाडीत बसलेल्या वडोदा गावच्या शाळकरी मुलींनी त्या 6 जणांना हटकले असता, त्या तरुणींनी मोर्चा मुलींकडे वळवत मुलींची छेड काढली. त्यांना धक्काबुक्कीही केली. तसेच अंगावर धावून गेले असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीवरून खांडवी येथील विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे यांच्यासह दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेमुळे शाळकरी मुली किती सुरक्षित आहेत, हे दिसतेय.