शितला अष्टमीला रंग खेळले, मग अंघोळीला बाथरुममध्ये गेले, तासाभराने थेट मृतदेहच बाहेर आले !
रंग खेळून पती-पत्नी अंघोळीला बाथरुममध्ये गेले. मात्र एक तास झाला तरी ते बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तोडला.
भीलवाडा : हल्ली गिझरमुळे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शितला अष्टमीला रंग खेळून आल्यानंतर चार वर्षाच्या मुलासह पती-पत्नी बाथरुममध्ये अंघोळीला गेले. मात्र गिझरमध्ये अचानक बिघाड झाल्याने गॅसमुळे दाम्पत्याचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमधील भीलवाडा येथे घडली आहे. दाम्पत्याचा 4 वर्षाचा बेशुद्ध अवस्थेत असून त्याला उपचारासाठी भीलवाडा येथे रेफर करण्यात आले आहे. शिवनारायण झंवर आणि कविता झंवर अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. बराच वेळ दाम्पत्य बाथरुममधून बाहेर आले नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
रंग खेळल्यानंतर दाम्पत्य अंघोळीला गेले
शाहपुरा येथे बुधवारी शितला अष्टमीनिमित्त दाम्पत्य रंग खेळले. रंग खेळल्यानंतर दाम्पत्य आणि चार वर्षाचा मुलगा अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. मात्र एक तास झाला तरी तिघे बाहेर आले नाही. यामुळे घरच्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर घरच्यांनी दरवाजा तोडला.
घरच्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर तिघेही बेशुद्ध पडले होते
बाथरुममध्ये जाऊन पाहिले असता तिघेही बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. घरच्यांनी तात्काळ तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दाम्पत्याला मृत घोषित केले, तर चार वर्षाचा बेशुद्ध असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी भीलवाडा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
गिझरमधील गॅसमुळे दाम्पत्याचा मृत्यू
गिझरमधून निघालेल्या गॅसमुळे श्वास गुदमरल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.