डोंबिवली / सुनील जाधव : डोंबिवली स्टेशन परिसरात दूध व्यवसायाच्या आडून सुरु असलेल्या रेल्वे तिकीटाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याला आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकत बेड्या ठोकल्या आहेत. सुनील दुबे असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 68 हजार रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. या प्रकणात तिकिटाचा काळाबाजार करण्यात आणखी काही रेल्वे कर्मचारी यात सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानक हे अत्यंत रहदारीचे स्थानक असून, येथून दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे देखील स्थानकातून बुकिंग होते. प्रवाशांची संख्या जास्त असल्याचा फायदा दलाल घेत असून, या स्थानक परिसरात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार देखील चालतो. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या दूध डेअरित 500 ते 1000 रुपये प्रति सीट कमिशनवर रेल्वे तिकिटे विकली जात होती.
याबाबत आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. डेअरीवर छापा टाकत डेअरी चालवणाऱ्या सुनील दुबे याला अटक केली असून, त्याच्याकडून आरपीएफने 1 लाख 68 हजार रुपये किमतीची 94 रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत.