फॉर्च्युनरची अनेक वाहनांना धडक, स्कुटीला फरफटत नेले, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास करोल बाग परिसरात एका वेगवान फॉर्च्युनर कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली.
नवी दिल्ली : मद्यधुंद फॉर्च्युनर (Fortuner) चालकाने अनेक वाहनांना धडक देत एका स्कुटी (Scooty)ला 100 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची थरारक घटना सोमवारी करोल बाग परिसरात घडली आहे. या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेवेळी फॉर्च्युनर कार भरधाव वेगात असल्याचे दिसते. या अपघातात स्कूटी चालक गंभीर जखमी झाला आहे.
रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला अपघात
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास करोल बाग परिसरात एका वेगवान फॉर्च्युनर कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली.
भरधाव वेगात होती फॉर्च्युनर कार
गाडीचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्याने प्रथम अनेक वाहनांना धडक दिली, नंतर पुढे जाऊन एका स्कूटीस्वाराला सुमारे 100 मीटरपर्यंत ओढले. अपघातानंतर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
कारसह चालक ताब्यात
या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. सध्या पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. यात एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे. इतर वाहनांची माहिती घेतली जात आहे.
फॉर्च्युनर कारमध्ये दोन जण होते
ही घटना करोल बाग येथील पदम सिंह रोडची आहे. आरोपी फॉर्च्युनर कारमध्ये दोघेजण मद्यधुंद अवस्थेत होते. रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. कारमध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्याचं लोक सांगतात. स्कूटरस्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारचा वेग अतिशय वेगवान असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याने आधी स्कूटीस्वाराला धडक दिली, नंतर दुसऱ्या कारला धडक दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारने सुमारे 5 ते 6 वाहनांना धडक दिली आहे. एका रिक्षालाही धडक केली.