अहमदनगर : आठ दिवसापासून वीज खंडित करण्यात आल्याने पिकाला पाणी कसे द्यायचे या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास गेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात उघडकीस आली आहे. पोपट जाधव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती आणि पीककर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता वीज वितरण कंपनीमुळे शेतीला फटका बसत आहे.
नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांचे वीजबिल थकले होते. थकीत वीज बिल भरत नसल्याने वीज वितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता.
गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज नसल्याने शेतपिकाला पाणी देण्याचा मोठा प्रश्न जाधव यांच्यासमोर निर्माण झाला होता.
मयत शेतकरी पोपट जाधव यांची शेती असून, शेतात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र वीजच नसल्याने पिकाला पाणी द्यायचे कसे हा यक्षप्रश्न जाधव यांच्यासमोर उभा होता.
आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
पीकाला पाणी न मिळाल्यास पीकाचे नुकसान होईल, या विवंचनेतून त्यांनी आज पहाटेच्या सुमारास झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.