Crime News | शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले, पाहा कुठे घडली धक्कादायक घटना
एका शेतकऱ्याने बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादाखक घटना खामगाव येथे घडली आहे. या प्रकरणाने खामगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बॅंक शाखा व्यवस्थापकाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलविले आहे.
गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा | 14 फेब्रुवारी 2024 : राज्यातील शेतकरी एकीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असताना आता एक खळबळजनक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने एका बँक मॅनेजरच्या पोटात चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या बँक मॅनेजरचे प्राण बचावले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर शेतकऱ्याला पोलिसांना ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
राज्यातील अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटाने शेतकरी त्रस्त असताना मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या हजारो प्रकरणे घडली आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बॅंकेतील पैसे काढण्यासाठी तंगवणाऱ्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे. या बाबतची हकीकत अशी की खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील किरण गायगोळ हे शेतकरी आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. बँकेतून पैसे काढण्यासाठी मॅनेजरकडून उशीर केला जात होता. सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता. मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार केला. यावेळी मध्ये पडलेले अन्य एक बॅंक कर्मचारी देखील जखमी झाले.
बॅंक मॅनेजरची केली होती तक्रार
शेतकरी किरण गायगोळ यांनी या बॅंक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली असल्याने या मॅनेजरकडून त्याला त्रास दिला जात होता असा शेतकऱ्याचा आरोप आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी किरण गायगोळ यांनी मॅनेजर शंतनू राऊत यांच्या पोटात दोन वार केले. यामुळे राऊत गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेले अरविंद निंबाळकर हे देखील जखमी झाले. बँक मॅनेजर राऊत यांना खामगाव शहरातील सिल्वरसिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.