अंबरनाथमध्ये अग्नीकल्लोळ, गॅरेजला भीषण आग; आगीत 8 ते 10 गाड्यांसह गॅरेज संपूर्ण जळून खाक
अंबरनाथमधील ऑटोक्राफ्ट नावाच्या गॅरेजला भीषण आग लागल्याने गॅरेजमधील 8 ते 10 गाड्यांसह गॅरेज जळून खाक झाले. एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.
अंबरनाथ / निनाद करमरकर : अंबरनाथमध्ये एका कारच्या गॅरेजला आज सकाळच्या सुमारास मोठी आग लागल्याचे घटना घडली. या आगीत गॅरेज संपूर्णपणे जळून खाक झालं असून, गॅरेजमधील 8 ते 10 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाने एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली. ही आग लागली नसून, कुणीतरी जाणीपूर्वक लावली असल्याचा संशय गॅरेज मालकाने व्यक्त केली. आगीत गॅरेज जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला
अंबरनाथमधून बदलापूरकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गाला लागून चिखलोली डीमार्टच्या जवळ ऑटोक्राफ्ट नावाचं कारचं गॅरेज आहे. या गॅरेजला आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅरेजमधील सीएनजी गाड्यांचे स्फोट होऊ लागल्यामुळे ही आग आटोक्याबाहेर गेली.
आगीत गॅरेज जळून खाक
काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं. या आगीत हे गॅरेज संपूर्णपणे जळून खाक झालंय. तर गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या 11 गाड्यांपैकी जवळपास 8 ते 10 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर यासह एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या सहाय्याने दीड तासांच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं.
जाणीवपूर्वक आग लावल्याचा मालकाचा आरोप
या आगीत जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली नसून कुणीतरी जाणीवपूर्वक लावली असल्याचा संशय गॅरेजच्या मालकांनी व्यक्त केल्याची माहिती अंबरनाथचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. तसंच या दृष्टीने तपास केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.